पोलीस आयुक्तांची ठाणेदारांना सूचना : बदलीचे सत्र लवकरच अमरावती : कोणत्या ना कोणत्या कारणास्तव विवादीत राहिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची ब्लॅकलिस्ट तयार करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांना दिल्या आहेत. आता बदलीचे सत्र सुरू झाल्यामुळे अशा विवादित पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालय किंवा पोलीस नियंत्रण कक्षात अटॅच केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक पोलीस आयुक्तालयात रुजू झाल्यानंतर त्यांनी शिस्तप्रिय पोलिसिंगची संकल्पना अमलात आणली. पोलिसांनी कर्तव्यदक्षतेने जनतेच्या तक्रारींचा निपटारा करावा, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. मात्र, तरीसुध्दा काही कामचुकार पोलिसांमुळे अख्खे पोलीस खातेच बदनाम होत असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. पोलीस भरतीदरम्यान कामचुकारपणा करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर वाहतूक शाखेच्या १४ पोलिसांना मुख्यालय व नियंत्रण कक्षात अटॅच केले. अशाच पोलीस कर्मचाऱ्यांची ब्लॅकलिस्ट तयार करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांना दिल्यात. त्यामुळे दहाही ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आता 'ब्लॅकलिस्ट' तयार करणार आहेत. पुढील महिन्यात राज्य शासनाकडून बदल्याचे सत्र सुरु होणार आहे.
विवादित पोलिसांची 'ब्लॅकलिस्ट' तयार होणार
By admin | Published: April 23, 2016 12:14 AM