अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि शिवसेना यांच्यातील वाद आता महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना नवनीत राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह केला होता. त्यावरुन, मोठं राजकारण झालं अन् नवनीत राणा तुरुंगात गेल्या. आता, ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त खासदार राणा यांचे बॅनर अमरावतीत झळकले आहेत. त्यावर, त्यांच्या वाढदिवसाच्याही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यावरुनच, आता शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केलं आहे.
खासदार नवनीत राणांकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलं आहे. 'मातोश्री' बाहेर नवनीत राणा हिंदू शेरणी अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. 'जो प्रभु श्री राम का नहीं, श्री हनुमान का नहीं वो किसी काम का नहीं ' अशा अशयाचा मजकूर बॅनरवर छापण्यात आला आहे. या बॅनरमुळे पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. त्यातच, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नवनीत राणा शीख आहेत की मोची, असा सवाल अमरावतीचे जिल्हाध्यक्ष सुनिल खराटे यांनी नवनीत राणांच्या जन्मतारखेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
नवनीत राणा यांचे बॅनर झळकले असून ६ एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस असल्याचेही सांगण्यात आलं आहे. मग,६ एप्रिल रोजी नवनीत राण यांचा वाढदिवस असेल तर त्या जन्माने शीख आहेत, असा त्यांचा जन्मदाखला सांगतो. मग, त्या जन्माने शीख असतील तर राखीव मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवलीच कशी? असा प्रश्न खराटे यांनी विचारला आहे. तसेच, जर त्या जातीनं मोची असतील तर त्यांचा वाढदिवस हा त्या टीसीवर दाखल्याप्रमाणे १५ एप्रिल रोजी आहे. मग, नेमका कोणता टीसी खरा? असा प्रश्न नवनीत राणा यांनी विचारला आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांच्या दाखल्यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. राणा यांनी खोटी माहिती देत उमेदवारी अर्ज दाखल केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हाही दाखल आहे.