पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक; अमरावतीत जोरदार निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 11:52 AM2022-02-09T11:52:21+5:302022-02-09T12:50:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. अमरावती शहरातील राजकमल चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसने देशभरात कोरोना पसरवण्याचे काम केल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात आणि राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून अमरावतीत आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्याविरोधात अमरावती शहरातील राजकमल चौकात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यात. मोदी यांनी जनतेची माफी मागावी कारण त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. दरम्यान मोठ्या संख्येने अमरावतीत काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मोदी विरोधात घोषणाबाजी केल्याने सिटी कोतवाली पोलिसांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज काँग्रेसच्या वतीने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन देखील केली जात आहे. दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जर भाजपच्या कार्यकर्त्यावर भाजपच्या कार्यालयावर मोर्चा आणला तर भाजप कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ठोकून काढनार असा इशारा भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे यांनी एका ऑडिओ क्लिप मध्ये दिला होता. त्यानंतर आता भाजपचे कार्यकर्ते अमरावतीमधील भाजपच्या कार्यालयासमोर जमायला सुरुवात झाली आहे. दरम्यान या ठिकाणीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
महाराष्ट्राची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांनी मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे. अवघ्या तीन-चार तासांची मुदत देऊन लॉकडाऊन लावला. या आत्मघातकी पायरीमुळे देशात हाहाकार उडाला. राज्य सरकारने त्या काळात चांगल काम केलं, अस असतानाही पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत जे वक्तव्य केल, याचं आम्ही निषेध करतो. तसेच महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या मोदींना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.