अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत सोहळा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या सोयीच्या तारखेनुसार २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातला आहे. हा दीक्षांत सोहळा गाडगेबाबांच्या जयंती दिनी अर्थात २३ फेब्रुवारी रोजी होणे अपेक्षित होते. तथापि, केवळ गडकरींच्या सोयीसाठी गाडगेबाबांच्या जयंती दिनाला अव्हेरण्यात आल्याने विद्यार्थी संघटनांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. संभाजी ब्रिगेड आणि एआयएसएफने थेट सोहळा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा दरवर्षी २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनी आयोजित केला जातो. यंदा कोरोना संसर्गामुळे दीक्षांत सोहळा लांबणीवर पडला. यादरम्यान गाडगेबाबा यांच्या जयंती दिनी - २३ फेब्रुवारी रोजी या सोहळ्याच्या आयोजनाची तयारी आरंभली गेली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत झाला. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने नितीन गडकरी यांची भेट घेतली. मात्र, २३ फेब्रुवारी ही तारीख गडकरी यांच्याकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे दीक्षांत सोहळ्याला येऊ शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. गडकरी यांच्याच उपस्थितीत दीक्षांत सोहळा पार पाडण्याची भूमिका विद्यापीठाची आहे. त्यासाठी मग ज्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले, त्या संत गाडगेबाबांची जयंतीची तारीख बदलवून गडकरींच्या सोयीनुसार २१ फेब्रुवारी रोजी दीक्षांत सोहळा निश्चित करण्यात आला. विद्यापीठाच्या या भूमिकेचे तीव्र पडसाद विद्यार्थी संघटनांत आणि जनसामान्यांत उमटू लगाल्याने दीक्षांत सोहळा वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. विद्यापीठ ही स्थिती कोशल्यपूर्णरीत्या हाताळते की कसे, याकडे आता लक्ष लागले आहे.
गाडगेबाबांप्रति श्रद्धा आहेच. कोरोना संसर्गामुळे दीक्षांत सोहळ्याची तारीख निश्चित करताना काही अडचणी होत्या. स्थानिक व्यवस्थेच्या अनुषंगाने २१ फेब्रुवारी तारीख निश्चित झाली. नितीन गडकरी हे उपस्थित राहतील. दीक्षांत सोहळा २१ फेब्रुवारीलाच होईल.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू
दरवर्षी दीक्षांत सोहळ्याचे आयोजन संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनी केले जाते. यंदा कोरोना संसर्गामुळे हा सोहळा लांबणीवर पडला. आता २३ फेब्रुवारी रोजी, गाडगेबाबा यांच्या जयंती दिनी सोहळा होणे अपेक्षित आहे. विद्यार्थी संघटनांची मागणी सयुक्तिक आहे.- प्रवणी रघुवंशी, सिनेट सदस्य तथा अध्यक्ष, नुटा संघटना, अमरावती.