अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २९ मे रोजी आटोपला. मात्र, आता विद्यार्थ्यांना पदवी, पदविका वितरणाची महाविद्यालयांना तयारी करावी लागणार आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाने महाविद्यालयांना महिन्याभरात पदवी वितरण समारंभाचे आयोजन करून अहवाल सादर करण्यासाठी डेडलाईन दिली आहे.
दीक्षांत समारंभात हिवाळी २०१९ आणि उन्हाळी २०२० परीक्षेमधील पात्र विद्यार्थ्यांचे २०१८ चा एकरूप परिनियम क्रमांक ४ मधील अनुक्रमांक ८ व ९ मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार विद्यापीठाने आयोजित केलेल्या समारंभानंतर एक महिन्याच्या आत संलग्नित महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ महाविद्यालयात घेणे क्रमप्राप्त आहे. पदवी वितरण समारंभाच्या तारखेपासृून १५ दिवसांत अहवाल विद्यापीठाला सादर करावा लागणार आहे. कोविड १९ नियमांचे पालन करून पदवी वितरण समारंभाचे आयोजन करावे लागणार आहे. महाविद्यालयातच छोटेखानी कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा गौरव करावा लागणार आहे.
------------
विद्यापीठ एकरूप परिनियमानुसार संलग्नित प्रत्येक महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्याबाबत पत्राद्धारे कळविले आहे. महिन्याभरात हा समारंभ आयोजित करून प्राचार्यांना अहवाल पाठवावा लागणार आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ