अमरावती : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयातील बेड व इतर आरोग्यविषयक मदत तसेच विविध आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधण्यासाठी अमरावती परिमंडल कार्यालयात 'कोव्हीड- १९ समन्वय कक्षा'ची स्थापना करण्यात आली. अमरावती परिमंडलातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मदतीसाठी हा कक्ष काम करणार आहे.
सद्यस्थितीत उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या या संकटांत जीवाची पर्वा न करता सुरळीत आणि अखंडित सेवा देणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांना या आजारावर तातडीची मदत मिळावी यासाठी ऊर्जामंत्री राऊत यांनी प्रत्येक परिमंडळ कार्यालयात ' कोविड- १९ समन्वय कक्ष ' स्थापना करण्याचे आदेश दिले आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी सुरळीत व अखंडित वीज पुरवठ्यासह विविध सेवा देत आहेत. दरम्यान वर्षभरात अमरावती परिमंडाळांतर्गत अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील २०८ पुरुष व १० महिला अशा एकून २१८ अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यापैकी १३७ जण कोरोनामुक्त झाले असून ३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ७८ कर्मचाऱ्यांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहे.
कोरोना संसर्ग झाल्यानंतर अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबीयांना आरोग्यविषयक तातडीने मदत मिळावी, त्यांचे लसीकरण करण्यात यावे, शिवाय विविध आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी स्थापन केलेल्या कोविड- १९ या कक्षाचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता (प्रशासन)भारतभूषण औगड आहे, नोडल अधिकारी म्हणून उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सूर्यकांत फलटणकर, तर सदस्य म्हणून वरिष्ठ व्यवस्थापक सचिन जीवणे आणि सहायक विधी अधिकारी श्रीकांत चेडे काम करणार आहे. याशिवाय समन्वय कक्षाच्या मदतीसाठी अमरावती जिल्ह्याच्या कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रतीक्षा शंभरकर व व्यवस्थापक सुहास देशपांडे आणि यवतमाळ जिल्ह्यात कार्यकारी अभियंता (प्रशासन) संजय खंगार व व्यवस्थापक हिरामण नागपुरे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. महावितरणमधील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांसाठी कोरोना आजाराचा समावेश असलेला समूह आरोग्य विमा काढण्यात आलेला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आरोग्य सेवेबाबत काही अडचण असल्यास कर्मचारी किंवा त्यांच्या कार्यालयप्रमुखांनी समन्वय कक्ष प्रमुख, नोडल अधिकारी, सदस्य व दोनही जिल्ह्यांतील जबाबदारी स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता दिलीप खानंदे यांनी केले आहे.