- गजानन मोहोड
अमरावती- यंदा सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विभागात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार असल्याने दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. पाणीटंचाईच्या विविध योजनांसाठी यंदा प्राप्त वित्तीय अनुदानातून जिल्हानिहाय उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्ह्यांना ४३ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला. सर्वाधिक १९ कोटी ४८ लाख ६१ हजारांचे अनुदान बुलडाणा जिल्ह्याला मिळणार आहे.
पावसाळ्याच्या चार महिन्यांत केवळ ३६ दिवस पाऊस झाल्याने जलस्रोतांची अवस्था बिकट आहे. दरवर्षी गावागावांतील यंत्रणांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनद्वारा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, यंदा तो अद्यापही तयार झालेला नाही. यापूर्वीच्या कृती आराखड्यानुसार तयार करण्यात आलेल्या कामांसाठी शासनाने वित्तीय अनुदान मंजूर केले असून, त्यापैकी ४३ कोटींचा निधी शुक्रवारी पाचही जिल्ह्यांना उपलब्ध करण्यात आला. त्यामधून होणाऱ्या उपाययोजनांतून पाणीटंचाईचा सामना केला जाईल. यामध्ये अमरावती जिल्ह्याला ७ कोटी ८५ लाख, अकोला १३ कोटी ५० लाख, बुलडाणा १९ कोटी ४८ लाख, यवतमाळ १ कोटी २० लाख, वाशिम जिल्ह्यास १ कोटी ५० लाख रुपये उपलब्ध करण्यात आले.उपलब्ध निधीतून नवीन विंधन विहिरी व कूपनलिकांसाठी अमरावती जिल्ह्यात ८८ लाख, अकोला २५.५६ लाख, बुलडाणा १०२.६० लाख, नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीकरिता अमरावती ५.३५ कोटी, बुलडाणा १.९० कोटी, वाशिम ११.२५ लाख, तात्पुुरत्या पूरक नळयोजना घेण्यासाठी अमरावती ६७ लाख, अकोला २५.५५ लाख, बुलडाणा ९२.५९ लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अमरावती २५ लाख, बुलडाणा २.४६ कोटी, यवतमाळ ३२ लाख, वाशिम ६९.५६ लाख, खासगी विहीर अधिग्रहणासाठी अमरावती ७० लाख, अकोला १२.४८ लाख, बुलडाणा १.७४ कोटी, यवतमाळ ८८ लाख, तर वाशिम जिल्ह्यासाठी ६९.५६ लाख रुपये उपलब्ध करण्यात आले.
जिल्हानिहाय नळयोजनांचे अनुदानअकोला जिल्ह्यातील कारंजा रमजानपूर येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ३.४४ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ७.८३ कोटी, देऊळघाट येथे ४९.५७ लाख, सिरपूरला ३८.३८ लाख, चिखली शहरासाठी २.५१ कोटी, शिंदखेडला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १८.१९ लाख आणि अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा ते खांबोरा उन्नई बंधाºयापर्यंत पाइप लाइनद्वारे पाणी आणण्यासाठी ९.४२ कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले.
पाणीटंचाईचा कृती आराखडा केव्हा?यंदा जलप्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा नाही. जानेवारीपासून किती गावांत पाणीटंचाई जाणवू शकते, याचा अंदाज जिल्हा परिषद प्रशासनातर्फे बांधला जात आहे. उन्हाळ्यात किती गावांत पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवायच्या, जलस्रोतांची स्थिती, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, किती गावांत विहीर अधिग्रहणाची गरज आहे, कूपनलिका, विंधन विहीर, वीज बिलाचा भरणा न झाल्याने किती योजना बंद आहेत, किती गावांत टँकरची गरज आहे, या बाबींचा समावेश असणारा कृती आराखडा अद्यापही तयार नाही.