अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयांच्या हिवाळी-२०२० परीक्षा येत्या २६ फेब्रुुवारी ते ४ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहेत. मात्र, कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्याने या परीक्षा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अगोदरच अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश, अभ्यासक्रम आदी बाबी माघारल्या आहेत. आता कोरोना संसर्गाने यात भर घातली आहे.
विद्यापीठाने १ जानेवारी रोजी जारी केलेल्या अध्यादेशानुसार, अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या हिवाळी-२०२० परीक्षेचे २६ फेब्रुवारीपासून नियोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे या परीक्षा होणार आहेत. परंतु, फेब्रुवारीत वाढत असलेल्या कोरोनाच्या संक्रमित रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.
जमावबंदीसह शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ दरम्यान कर्फ्यू लागू राहील, असा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे. कोरोनामुळे उद्भवत असलेली स्थिती लक्षात घेता, २६ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षांवर कोराेनाचे सावट नक्कीच येईल, असे संकेत मिळू लागले आहेत. कोरोना संसगार्मुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशांना विलंब झाला आहे. अशातच हिवाळी परीक्षादेखील लांबणीवर पडल्याने या महाविद्यालयांपुढे प्रवेश शुल्काबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठाने अभियांत्रिकी परीक्षांना प्राधान्य दिले. सत्र ५, ७ व ८ परीक्षांचा कार्यक्रम तयार करण्यात आला. सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि, कोरोना संसर्गाची स्थिती बघता, अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षांविषयी नव्याने निर्णय होईल, अशी माहिती आहे.
--------------------
बॉक्स
परीक्षा विभागात कोरोनाचे रुग्ण वाढले
अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कोरोना संक्रमितांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. विद्यापीठाच्या परीक्षांचे ऑनलाईन कामकाज सांभाळणाऱ्या लर्निंग स्पायरल या कंपनीचे काही कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. परीक्षा विभागात काही अधिकारी, कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळल्याने परीक्षांचा डोलारा कसा हाताळणार, हा गंभीर प्रश्न विभागप्रमुखांसमोर उपस्थित झाला आहे.
----------------------
कोट
२६ फेब्रुवारी ते ४ एप्रिल दरम्यान अभियांत्रिकी, तांत्रिकी परीक्षांचे नियोजन आहे. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. परीक्षांबाबत विविध प्राधिकरण, वरिष्ठांच्या आदेशानुसार निर्णय घेण्यात येईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.