परतवाडा : अचलपूर नगरपालिकेच्या विद्युत विभागातील अभियंत्यासह परतवाडा शहरातील सदर बाजार स्थित एका कोरोनाग्रस्त व्यापाऱ्याचा अमरावती येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे दोघेही कोरोना संक्रमित होते. २० फेब्रुवारीला अचलपूर पोलीस ठाण्यात कार्यरत कोरोनाग्रस्त पोलीस शिपायाच्या मृत्यूनंतर कोरोनाग्रस्त व्यापारी व अभियंत्याच्या मृत्यूच्या वार्तेने अचलपूर-परतवाडा हादरले आहे.
यातच अचलपूर तहसीलमध्ये कार्यरत नायब तहसीलदार व त्यांचेकडील वरिष्ठ लिपिक कोरोना संक्रमित निघाले आहेत. २१ फेब्रुवारीला अचलपूर-परतवाडा शहरात ३० कोरोनाग्रस्त रुग्ण निघाल्याची माहिती नगरपालिका सुत्रांनी दिली आहे. विद्युत विभागातील कोरोनाग्रस्त अभियंत्याचा मृत्यू १९ फेब्रुवारीला सायंकाळी उपचारादरम्यान अमरावतीला झाल्याची माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली. मात्र, तरी कोरोनाग्रस्त मृत व्यापाऱ्याची माहिती नगरपालिका सूत्रांकडे नाही. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अचलपूर नगरपालिकेतील नगररचनाकारांचा उपचारादरम्यान अमरावतीत मृत्यू झाला होता. मृत नगररचनाकारसुद्धा त्यादरम्यान कोरोना संक्रमित होते.