अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढता असताना मृत्यूचे सत्र वाढतेच असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारपर्यंत १००७ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ८९६ व अन्य जिल्हे व मध्यप्रदेशातील १११ संक्रमितांचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यात संसर्ग वाढला असतांनाच लगतच्या नागपूर्, वर्धा व मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये देखील कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. त्यामुळे तेथील रोज रुग्ण अमरावती जिल्ह्यात दाखल होत आहे. यामध्ये गंभीर अवस्थेमधील बहुसंख्य रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल होत आहे. कोरोनासह अन्य आहार व उपचाराला झालेला उशीर यांसह अन्य कारणांमुळे आतापर्यत १११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात पहिल्या संक्रमिताचा मृत्यू ४ एप्रिल २०२० रोजी हाथीपुऱ्यात झालेला होता. त्यानंतर सातत्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. अमरावती जिल्ह्यात एप्रिल महिण्यात १०, मे ५, जून ९, जुलै ४०, ऑगस्ट ७४, सप्टेंबर १५४, ऑक्टोबर ७२, नोव्हेंबर १४, डिसेंबर १८, जानेवारी २२, फेब्रुवारी ९२, मार्च १६४ व एप्रिल महिन्यात आतापर्यंत २२२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. असे एकूण ८९६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
बॉक्स
मंगळवारी ८३८ नव्या रुग्णांची नोंद
जिल्ह्यात मंगळवारी नव्या ८३८ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ६२,८७२ वर पोहोचली आहे. या पाच दिवसांत संक्रमितांची संख्या वाढतीच आहे. मंगळवारी ३,६३५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २३.०५ पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
बॉक्स
पुन्हा १३ संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू
जिल्ह्यात उपचारादरम्यान मंगळवारी १३ मृत्यू झाले. यामध्ये जिल्ह्यात ४० वर्षीय पुरुष, (स्वावलंबीनगर), ३६ वर्षीय पुरुष, (बडनेरा), ८७ वर्षीय पुरुष, (योगिराज कॉलनी), २७ वर्षीय महिला, (मोर्शी), ५० वर्षीय महिला, (शिराळा), ४० वर्षीय महिला, (भैसदही), ४७ वर्षीय महिला, (अंबागेट), ७५ वर्षीय महिला, (महावीरनगर), तर अन्य जिल्ह्यातील ६७ वर्षीय पुरुष, (यवतमाळ), ५६ वर्षीय पुरुष, (बाजारगाव), ३६ वर्षीय महिला, (कारंजा, वर्धा), ५४ वर्षीय पुरुष, (यवतमाळ), ६३ वर्षीय महिला, (यवतमाळ) या रुग्णांचा समावेश आहे.