अमरावती : जिल्ह्यात पहिल्या कोरोना रुग्णाच्या नोंदीला बुधवारी ३०० दिवस झाले. या कालावधीत १९ हजार ५९६ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. रोज सरासरी ६५ रुग्ण निष्पन्न झालेले आहेत. याव्यतिरिक्त या कालावधीत कोरोना बळींची संख्या ३९६ वर पोहोचल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. पहिला रुग्ण हा ‘होमडेड’ असल्याने पहिल्या कोरोना बळीची नोंददेखील याच तारखेला झालेली आहे. त्यानंतर सातत्याने संक्रमितांची संख्यावाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट जिल्ह्यात झालेला आहे. या महिन्यात कोरोना डबलिंगचा रेट हा फक्त १५ दिवसावर आलेला होता. नागरिकांची सकारात्मक वृत्ती व आरोग्य यंत्रणेचे कसोशीचे प्रयत्न यामुळे कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात आलेले आहे.
नोव्हेंबरपश्चात म्हणजेच दिवाळी झाल्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होईल, असा आरोग्य यंत्रणेचा अंदाज होता व त्यादृष्टीने शासनाचा अलर्टदेखील होता. मात्र, सुदैवाने कोरोना संसर्ग माघारल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
कोरोनाची जिल्हास्थिती
जिल्ह्यात बुधवारी ७० अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १९,५९६ वर पोहोचली आहे, सद्यस्थितीत १८३ रुग्णांवर कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याव्यतिरिक्त महापालिका क्षेत्रात ६७ व ग्रामीणमध्ये १२३ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी १३८ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यत १८,२८७ व्यक्ती संक्रमणमुक्त झाल्या आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट उच्चांकी ९६.०८ असल्याने दिलासा मिळाला आहे.