अमरावती : जिल्ह्यात रविवारी २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात जिल्ह्यातील १७ रुग्ण असल्याने बाधितांची मृत्यू संख्या ८७८ झाली आहे. अन्य चार रुग्ण नागपूर, वर्धा व मध्यप्रदेशातील आहेत. याशिवाय ६८५ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ६१,१६५ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पॉझिटिव्हिटी वाढत आहे. शनिवारी २४ व रविवारी २२ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाली असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आता अधिकच वाढला आहे. महापालिका क्षेत्राच्या तुलनेत ग्रामीनमध्ये आता संसर्ग पसरल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. प्रामुख्याने वरूड, अचलपूर, धामणगाव, अंजनगाव सुर्जी व चांदूर रेल्वे तालुका आता कोरोनाचा नवा हॉट स्पॅाट बनला आहे.
जिल्ह्याबाहेरील ३०० वर रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे शासकीयसह खासगी रुग्णालयातील व्याप्त बेडची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर अन् आता लसीचाही तुटवडा निर्माण झालेला आहे.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनासह, शहर व ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या स्वतंत्र बैठकी घेतल्या आहेत. याशिवाय ऑक्सिजन तुटवड्याबाबत सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांसह पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी केले आहे.
बॉक्स
जिल्ल्ह्यात आठ महिन्यांच्या बाळासह १७ मृत्यू
अमरावती जिल्ह्यात ५५ वर्षीय महिला, (नांदगाव खंडेश्वर), ६२ वर्षीय महिला, (आष्टी, वर्धा), ६० वर्षीय महिला, (अंजनगाव), ६० वर्षीय पुरुष, (तळी, पोहनी), ७० वर्षीय पुरुष, (भारवाडी, तिवसा), ६५ वर्षीय पुरुष, (माणिकवाडा), ३५ वर्षीय पुरुष, (शेंदूरजना घाट, वरूड), ५० वर्षीय पुरुष, (नांदगाव खंडेश्वर), ५३ वर्षीय पुरुष, (डोंगरगाव), ८ महिन्यांचे बालक, (करजगाव मोर्शी), ३६ वर्षीय महिला, (छिंदवाडा), ५३ वर्षीय पुरुष, (धामणगाव रेल्वे), ३६, पुरुष, (टेलिकॉम कॉलनी), ७५ वर्षीय महिला, (अर्जुन नगर), ३८ वर्षीय पुरुष, (कांडली, अचलपूर), ३३ वर्षीय पुरुष, (नांदगाव खंडेश्वर) व ६० वर्षीय महिला, (मुदलियार नगर)या १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बॉक्स
नागपूर येथील चौघांचा चौघांचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार घेताना अन्य चार रुग्णांचा झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या-त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे. यात ७० वर्षीय पुरुष, (नागपूर), ६२ वर्षीय पुरुष, (इंद्रनगर, नागपूर), ५७ वर्षीय पुरुष, (मिनी मातानगर, नागपूर), ६० वर्षीय महिला, (नरेंद्र नगर, नागपूर) या रुग्णांचा समावेश आहे.