अमरावती : तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याने आरोग्य विभागाद्वारा आतापासून नियोजन सुरू आहे. मात्र, मेअखेरपर्यंत जिल्ह्यात १० वर्षांआतील २,३२६ चिमुकले संक्रमित झाल्याची धक्कादायक नोंद आहे. यामध्ये १,२७५ बालके व १,०५१ बालकांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा वयोगटानुसार नव्हे, तर प्रत्येकाला संसर्ग होत असल्याचे स्पष्ट आहे.
जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण नोंद झाला होता. तेव्हापासून दुसऱ्या लाटेच्या अखेरपर्यंत म्हणजेच मे अखेरपर्यंत जिल्ह्यात ९२,१४८ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. यामध्ये ० ते १० वयोगटात २,३२६, ११ ते २० वयोगटात ६,५०६, २१ ते ३० वयोगटात १८,१५८ ३१ ते ४५ वयोगटात २७,१०८, ४६ ते ६० वयोगटात २३,३८३ व ६० वर्षांवरील १४,६६७ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे व यामध्ये १,४६७ व्यक्ती उपचारादरम्यान मृत झाल्या आहेत. यात ५५,८४३ पुरुष व ३६,३०५ महिला संक्रमित झाल्या आहेत.
जिल्ह्यात चिमुकल्यांना संसर्ग झाल्यास सुरुवातील फारशी व्यवस्था नव्हती मात्र, ऑगस्ट, सप्टेंबर २०२० च्या पहिल्या लाटेत जेव्हा काही चिमुकले संक्रमित झाले. त्यानंतर येथील जिल्हा कोविड रुग्णालयात बालरोगतज्ञांची नियुक्ती करण्यात आली व काही बेड चिमुकल्यांसाठी राखीव ठेवण्यात आले. याशिवाय एका खासगी रुग्णालयात बालरोतज्ञांसह चिमुकल्यांसाठी सुविधा असल्याची माहिती आहे.
लहान मुलांना त्यांना होत असलेला त्रास व्यवस्थितरीत्या सांगता येत नसल्याने त्यांना झालेला कोरोनाचा संसर्ग ओळखणे पालकांची कसोटीच असते. मात्र, कोरोनाचे काही लक्षणे आढळताच चाचणी करून घेणे केव्हाही उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पाईंटर
वय व लिंगनुसार कोरोना पॉझिटिव्ह
वयोगट पुरुष महिला
० ते १० १,२७५ १,०५१
११ ते २० ३,६०६ २,८०८
२१ ते ३० १०,७७३ ७,४८५
३१ ते ४५ १६,८२७ १०,२८१
४६ ते ६० १४,११९ ९,२६४
६० वर्षावरील ९,३४१ ५,३२६
बॉक्स
३१ ते ४५ वयोगटात सर्वाधिक संक्रमित
जिल्ह्यात ३१ मे पर्यत ९२,१४८ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. यामध्ये सर्वाधिक २७,१०८ व्यक्ती ३१ ते ४५ वयोगटातील आहे. यात १६,८४७ पुरुष व १०,२२१ महिलांचा समावेश आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त पुरुषांना सतत बाहेर राहावे लागते व यातही बिनधास्तपणा जास्त यामुळे संक्रमितांचे प्रमाण वाढते असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
२० वर्षाआतील ८,८३२ युवांना संसर्ग
जिल्ह्यात ३१ मे पर्यत ० ते २० वयोगटातील ८,८३२ युवांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. यामध्ये ४,८८३ युवा व ३,९४९ युवती आहेत. यावयोगटात रोगप्रतिकारशक्ती चांगली राहत असल्याने मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. बहुतांश रुग्ण हे असिम्टमॅटीक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्रिसुत्रीसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन महत्वाचे आहे.
बॉक्स
चिमुकल्यांसाठी हे टाळा
चिमुकल्यांना वाफ देण्याचा अट्टाहास करु नये, आजी -आजोबांच्या संपर्कात येवू देऊ नये, घरगुती उपचार व काढा याचा भडीमार करु नये, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बाजारु अौषधांचा वापर करु नये. चिमुकल्यांना पालकांच्या निरीक्षणाखाली मास्क वापरावा, ताप घसादुखी, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, पोटदुखी असल्यास डॉक्टरांना दाखवावे.
बॉक्स
जिल्हा कोविड रुग्णालयात ६० बेड
तिसऱ्या लाटेत चिमुकल्यांना संसर्ग वाढणार असल्याने येतील जिल्हा कोविड रुग्णालयात ६० बेड तसेच सर्व डीसीएचमध्ये प्रत्येकी १० बेड राखीव ठेवण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त डीसीएचसीमध्ये प्रत्येकी ५ बेड राखीव ठेवण्यात येणार आहे. याशिवाय बालरोगतज्ञांची संख्या देखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.