लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरासह जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. सोमवारी १४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये तीन वर्षांचा बालक, मुंबई पोलिसाची पत्नी व तीन महिन्यांची चिमुरडी, आशा वर्कर व दोन डॉक्टर व एसआरपीएफ जवान आदींचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता १७८ वर पोहोचली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विषाणू परीक्षण प्रयोगशाळेद्वारा प्राप्त अहवालानुसार ताजनगरात बाधित आजीच्या संपर्कात आलेली तीन महिन्यांच्या चिमुकलीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तिच्या आईचा अहवाल अप्राप्त असल्याने संक्रमित बाळाजवळ थांबण्याचा आईचा हट्ट यातून वृत्त लिहिस्तोवर तोडगा निघालेला नाही. मद्राशी बाबा नगरातील ३८ वर्षीय पुरुष, शिवनगर येथे ३३ वर्र्षीय तरुण, या व्यतिरिक्त गांधीनगरमध्ये वास्तव्य असणारी ३७ वर्षीय पॉझिटिव्ह व्यक्ती ही व्यक्ती डॉक्टर आहे. खुर्शिदपुरा भागात ११ वर्षांचा मुलगा व १३ वर्षांच्या मुलगी तसेच मावडे प्लॉट येथील ४० वर्षीय आशा वर्कर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. या व्यतिरिक्त अचलपूर येथील ४६ वर्षीय डॉक्टरांनी येथील कोविड रुग्णालयात सेवा दिली, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सायंकाळच्या अहवालानुसार हॉटस्पॉट असलेल्या मसानगंजमध्ये दोन महिला व एसआरपीएफ कॅम्प येथे एक जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात बाधितांची संख्या आता १७८ वर पोहोचली आहे. यामध्ये १५ मृत, तर ८४ रुग्णांवर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सोमवारी सायंकाळी चार व्यक्ती उपचाराने बरे झाल्याने त्यांना कोरोनामुक्त करण्यात येऊन गृह विलगिकरणात सात दिवस ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या ७९ झालेली आहे.मुंबईत संक्रमित पोलिसाची पत्नी व मुलगा पॉझिटिव्हजिल्हा ग्रामीणमध्ये चांदूरबाजार तालुक्यात हिरुळपूर्णा येथे तीन वर्षांच्या मुलासह त्याची आई संक्रमित झालेली आहे. ती मुंबई पोलिसमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्याची पत्नी आहे. १७ मे रोजी ती माहेरी आली व गावातच संस्थात्मक विलगिकरणात राहिली. २१ मे रोजी पोलिसाचा अहवाल पॅझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच त्यांची पत्नी व मुलाचा स्वॅब घेण्यात आला. सोमवारी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिवारातील आठ सदस्य क्वारंटाइन करण्यात आल्याचे चांदूरबाजार येथील तहसीलदार अभिजित जगताप यांनी सांगितले.दोन डॉक्टर, एक आशा वर्कर पॉझिटिव्हअचलपूर येथील ४७ वर्षीय डॉक्टर यांनी येथील कोविड रुग्णालयात सेवा दिली. क्वारंटाईनमध्ये असताना त्यांचा स्वॅब तपासणीला पाठविला असता, सोमवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. गांधीनगरातील ३७ वर्षीय डॉक्टरांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा दिली, त्यांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आलेला आहे. याव्यतिरिक्त कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य पथकात गृहभेटी देणाऱ्या मावडे प्लॉट येथील ४० वर्षीय आशा वर्कर व एक एसआरपीएफ जवानाचा अहवाल सोमवारी आल्याने जिल्ह्यात आतापर्यंत १६ कोरोना वॉरिअर्स संक्रमित झालेले आहेत.
अमरावतीमध्ये कोरोनाचा स्फोट; आणखी १४ पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांची संख्या १७८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 7:50 PM
अमरावती शहरासह जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. सोमवारी १४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये तीन वर्षांचा बालक, मुंबई पोलिसाची पत्नी व तीन महिन्यांची चिमुरडी, आशा वर्कर व दोन डॉक्टर व एसआरपीएफ जवान आदींचा समावेश आहे.
ठळक मुद्देतीन महिन्यांची चिमुरडी, तीन वर्षांचा मुलगा संक्रमित