धारणी : तालुका मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील चाकर्दा या गावात शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक पाहावयास मिळाला. एकाच दिवशी ३६ रुग्ण पाझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
दहा-बारा दिवसांपासून चाकर्दा ‘हॉटस्पॉट’ झोनमध्ये आल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित केली. त्या अनुषंगाने आमदार राजकुमार पटेल आणि तहसीलदार अतुल पाटोळे यांनी गावाला भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली होती. लोकांनी तपासणी करण्यास नकार दिल्याने रुग्णवाहिका वैद्यकीय चमूसह परत आली. त्यामुळे गावातील लोक बेजबाबदार झाले असून, पॉझिटिव्ह रुग्ण बेभान होऊन फिरत असल्यामुळे गावात सामूहिक संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
१० ते १२ दिवसांत तेथे जवळपास आठ मृत्यू झाले असून, अनेकजण आजही अमरावती येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. असे असताना गावात खबरदारीचे उपाय म्हणून सामाजिक अंतर ठेवणे आणि मास्क लावणे याकडे गावातील नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. पॉझिटिव्ह आलेले रुग्ण सर्रास गावात फिरत असल्यामुळे सामूहिक संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.