:
धारणी : तालुका मुख्यालयापासून ३० किलोमीटर अंतरावरील आणि चिखलदरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या चिखली येथे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. तेथे आजमितीस ७४ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असून, दोघांना श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे अमरावतीला हलविण्यात आल्याची माहिती आहे.
धारणी तालुक्यातील चाकर्दा गावाप्रमाणेच चिखलदरा तालुक्यातील चिखली या गावातसुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या गावातसुद्धा अनेकजण मृत्युमुखी पडले असून तात्पुरत्या स्वरूपात निर्माण केलेल्या आदिवासी आश्रमशाळेतील कोविड सेंटर येथे ७४ रुग्ण उपचार घेत आहेत. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी चिखली गावाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. आश्रमशाळेत सुरू असलेल्या रुग्णालयात रुग्णांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी चिखली गावात भेट दिली. गावातील नीरव शांतता पाहून त्यांनी गावकऱ्यांना भीती बाळगू नका, कोरोनातून आपण बरे होतो, उपचार घ्या, भूमका परिहार यांच्या नादी लागू नका, असे आवाहन केले.
आदिवासींमध्ये अंधश्रद्धा
कोरोना आजाराशी झुंज देण्याची क्षमता खेकड्यात असल्याची अफवा वजा अंधश्रद्धा पसरल्याने चिखली गावातील अनेकांनी सिपना नदीच्या काठावर खेकडे पकडण्यासाठी धाव घेतली. दिवसभर नदीपात्रातून खेकडे गोळा करून संध्याकाळी शेतातील झोपडीमध्येच खेकडा पार्टी साजरा करण्यात येत आहे. यामुळे गावातील कोरोनापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करीत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी राजकुमार पटेल यांच्यासोबत त्यांचे सहायक सुरेंद्र देशमुख, कालू मालवीय, प्रमोद गांजरे उपस्थित होते.