वरूड : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला आहे. दोन दिवसांत तब्बल ६६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. १ मार्च रोजीदेखील ३८ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले होते. त्यात शहरातील १९ रुग्णांचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा २८ रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने चिंता वाढली आहे. परिणामी कोरोना त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध थेट फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोना अटकावासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी आपत्ती व्यवस्थापन व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तहसीलदार सुटीवर, तर उपविभागातील अधिकारी प्रभारी असल्याने कोरोनाबाबतचा निर्णय घ्यावा तरी कुणी, हा प्रश्न असल्याची चर्चा प्रशासनात आहे. वरूड शहरासह तालुका ‘कोरोना हॉट स्पॉट’ होत असताना, मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची रजा मंजूर तरी कशी केली जाते, हा जनसामान्यांचा प्रश्न आहे. नागरिक स्वैर झाल्याने नगरपालिकेच्यावतीने आता थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाने एक वर्षापासून नागरिकांचा पिच्छा सोडलेला नाही. यावर्षी पुन्हा गत पंधरवाड्यापासून कोरोनाने तोंड वर काढले. तहसीलदार रजेवर असल्याने प्रशासन सुस्त असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत बैठक झाली नसल्याने निर्णय कुणी घ्यावा, हा प्रश्न आहे. उपविभागीय अधिकारीसुद्धा प्रभारी असल्याने कोरोनाकाळात पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी होत आहे.
- तर थेट फौजदारीच
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे, विनाकारण गर्दी करू नये, अन्यथा थेट फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करू, असे आवाहन नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले. सार्वजनिक, घरगुती कार्यक्रमात, दुकानात, उपाहारगृहात, वाहनात निर्धारित संख्येपेक्षा अकारण गर्दी दिसल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. शहरातील ज्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल, ते संपूर्ण घर सॅनिटाईझ केले जाईल. कंटेनमेन्ट झोन तयार करून परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना पॉझिटिव्ह आणि विलगीकरणातील नागरिक रस्त्यावर दिसल्यास फौजदारी कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी सांगितले.
नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे
शहरासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांनी मास्कचा वापर करावा. गर्दीत जाणे टाळावे. विनाकारण रस्त्यावर येऊ नये. ताप, सर्दी झाल्यास वेळीच विनाविलंब उपचार घ्यावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल देशमुख व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी केले आहे.
-----------