जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांची ग्वाही, अविशांत पांडा यांनी पदभार स्वीकारला
अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणू संक्रमणावर नियंत्रण ही माझी सर्वांत महत्त्वाची जबाबदारी आहे. रखडलेली आवास योजनेची कामे पूर्णत्वास आणणे आणि मेळघाटातील कुपोषणमुक्ती ही माझ्यासाठी कर्तव्यपूर्ती राहील, अशी ग्वाही नव्याने रुजू झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी दिली.
अविशांत पांडा यांनी गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पदाचा पदभार स्वीकारला, यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी खातेप्रमुख आणि कामकाजांबाबत चर्चा केली. सध्या जिल्ह्यात वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रदूषणावर नियंत्रण करणे ही प्रशासनाची पहिली जबाबदारी आहे आणि तोच माझाही प्राधान्यक्रम असेल. याशिवाय जिल्ह्यात रखडलेली व तांत्रिक अडचणीत असलेली आवास योजनेची कामे, मेळघाटाला कुपोषणमुक्त करणे याला अधिक प्राधान्य दिले जाईल. नंदुरबार जिल्ह्यातील तरोडा येथे प्रकल्प संचालकपदावर कार्यरत होतो. त्यामुळे तेथील आदिवासी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असल्याने मेळघाटात त्याच धर्तीवर व त्यापेक्षा चांगले काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही ठिकाणी आदिवासींच्या समस्या समान आहेत. आदिवासींचे स्थानांतरण व कुपोषणमुक्ती यावर मेळघाटात भर देणे गरजेचे आहे. आदिवासींना जास्तीत जास्त स्थानिक पातळीवर रोजगार कसा प्राप्त होईल, याचाही प्रयत्न ते करणार असल्याचे पांडा म्हणाले. १० ते १२ वर्षांपासून बंद असलेली जिल्हा परिषदेची प्रिंटिंग मशीन सुरू करण्यावर भर दिला जाईल. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात जे काही चांगले करता येईल, ते करण्याचा प्रयत्न राहील. जिल्ह्यातील विकासकामे व रखडलेल्या कामांचा आढावा घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस अविशांत पांडा यांनी व्यक्त केला. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, दत्तात्रय फिसके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर आदी उपस्थित होते.