अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कामकाज कोरोना संसर्गामुळे १३ मार्च २०२० पासून बंद झाले. त्यानंतर कोरोनाचे गडद संकट, परीक्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, परीक्षांचे नियाेजन आणि निकालाच्या गोंधळाच यावर्षी विद्यापीठाचा कारभार गाजला आहे.
यंदा विद्यापीठाने उन्हाळी २०२० परीक्षांचे २० एप्रिलपासून नियोजन चालविले होते. मात्र, कोरोनाचे संकट आले आणि १३ मार्चपासून विद्यापीठाचा कारभार बंद झाला. त्यामुळे परीक्षा कधी, कशा घ्याव्यात, हा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित झाला होता. दरम्यान, ८ मे रोजी शासनाने परीक्षा, निकालाचे नियोजनबाबत समिती नेमली. या समितीच्या अहलावानुसार नियमित परीक्षा न घेता ५० टक्के सत्र गुण व ५० टक्के अंतर्गत गुणाच्या आधारे परीक्षा घेण्याचे ठरविले. या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, अंतिम वर्षाची परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबत शासनाचे पत्र प्राप्त झाले. कोरोना स्थितीचा आढावा आणि परीक्षा शक्य नाही त्यानुसार ८ मे रोजीच्या शासन पत्रानुसार नियमित सत्राचा निकाल ३० ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. परंतु, १९ जून २०२० रोजीच्या शासनादेशानुसार अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता निकालाचे सत्र सुरू झाले. मात्र, परीक्षा न घेता पदवी देण्यास विरोध म्हणून काही विद्यार्थी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने ३ सप्टेंबर रोजी विद्यापीठांना पत्र पाठवून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत ठरविले. १ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान परीक्षा व निकालाची डेडलाईन होती. मात्र, विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप २३ सप्टेंबरपासून सुरू होऊन ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आला. त्यानंतर १२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत तांत्रिक अडचणी उद्भवल्या. २० ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्याचे निश्चित झाले. मात्र, तांत्रिक अडचणी कायम असल्याने परीक्षा स्थगित करून प्राधिकरणाच्या मान्यतेने महाविद्यालयीन स्तरावर परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यानुसार २६ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात आल्या.
पहिला निकाल फार्मसी अभ्यासक्रमाचा ३ नोव्हेबर रोजी जाहीर झाला. २४ नोव्हेबरपर्यंत निकाल जाहीर करण्यात आले असून, ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या अद्यापही कायम आहे.
------------------
यंदा कोरोना संकटाने परीक्षा, निकालाचे नियोजन कोलमडले आहे. न्यायालय आणि शासन निर्देशानुसार परीक्षांचे संचालन करण्यात आले. आतापर्यंत विविध सहा परीक्षांचे नियोजन करण्यात आले.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.