गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाने दगावलेल्यांच्या वारसांना तातडीने मदत मिळावी, याकरिता ऑनलाईन अर्ज पोर्टलवर मागविण्यात येत आहेत; मात्र या पोर्टलच्या सॉफ्टवेअरमधील अडचणींमुळे यंत्रणेचा गोंधळ उडत आहे. नागपूरचे तब्बल २६२० अर्ज अमरावतीच्या लॉगिनमध्ये असल्याचे पडताळणीत आढळून आले. त्यामुळे प्राप्त ऑनलाईन अर्जांचा आकडा फुगला. जिल्ह्यात १५६८ दगावले असताना अनुदानासाठी तीन हजारांवर अर्ज आल्याने समिती सदस्यही बुचकळ्यात पडले आहेत.जिल्ह्यात १५६८ पैकी महापालिका क्षेत्रात ५६७ नागरिक कोरोना संसर्गामुळे दगावले असताना अनुदान मागणीसाठी दुपटीने अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे. या अर्जांमध्ये अतिरिक्त एंट्री या नागपूरच्या असल्याचे पडताळणीत दिसून आले. त्यामुळे समितीद्वारा याविषयीची कल्पना संबंधित टेक्निशियनला दिल्यानंतर आता कुठे अमरावतीचे ९४० अर्ज पडताळणीसाठी उपलब्ध झाले आहेत. यामध्ये १६७ अर्ज हे परिपूर्ण असल्याने पुढच्या प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहेत.कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्या नागरिकांच्या निकटच्या नातेवाइकांना ५० हजारांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. याकरिता नागरिकांना mahacovid19relief.in यावर लॉगिन करणे आवश्यक आहे. यानंतर लिंक देण्यात येते. मृताच्या वारसाने त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे प्रमाणपत्र, रुग्णालयाचा तपशील, स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरून अनुदान मागणीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज नामंजूर झाल्यास अर्जदारास अपील करण्याचा अधिकार आहे. येत्या आठवड्यात अनुदान देण्यात येणार असल्याने सीएस व एमओएच यांच्या समिती कामाला लागल्या असताना सॉफ्टवेअरमध्ये रोज नव्या अडचणी येत असल्याने यंत्रणांचा गोंधळ उडत आहे.
युनिक आयडी पुन्हा ॲक्सेप्ट होत नाहीयापूर्वी कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्या व्यक्तीकरिता युनिक आयडी आरोग्य विभागाद्वारा देण्यात आला व तो ‘आयसीएमआर’ला पाठविण्यात आलेला आहे. हा आयडी आता पुन्हा पाठविल्यास ॲक्सेप्ट होत नाही. त्यामुळे अर्जाची पडताळणी करताना आरोग्य यंत्रणेला अडचणी येत आहेत. याशिवाय ओटीपी बऱ्याचदा येत नसल्याने यंत्रणेला ताटकळत बसावे लागत आहे.
सॉफ्टवेअरमधील अडचणी- अन्य जिल्ह्यातील अर्जाची एंट्री- टॅगिंग व्यवस्थित झालेले नाही.- ओटीपी बरेचदा येत नाही.- अपलोड डॉक्युमेंट दिसत नाही.- रिटर्नच्या गाईड लाईन पुरेशा नाहीत.
सॉफ्टवेअरमध्ये काही अडचणी येत आहेत. सुरुवातीला नागपूरची एंट्री असलेले २६०० अर्ज अमरावती लॉगिनमध्ये दिसून आले. याबाबत संबंधितांना कल्पना दिल्यावर आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आलेली आहे.- डॉ. विशाल काळेएमओएच, महापालिका.