सकाळी ७ ते ११ गर्दीच्या ठिकाणी नागरिकांवर कारवाईचा दंडुका
अमरावती : शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून कडक लाॅकडाऊन सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी जीवनाश्यक वस्तू भाजीपाला आणि अन्य साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. मात्र, दुपारनंतर लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले. दरम्यान पोलिसांमार्फत विनाकामाने फिरणाऱ्या वाहनचालकांवर व नागरिकांवर कारवाईचा दंडुका उगारला जात आहे.
शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही शहर व परिसरात विनाकारण रस्त्यावरून नागरिकांची भटकंती सुरू आहे. संचारबंदीच्या काळात रस्त्यावरून विनाकारण संचार करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन सुरू केले होते. मात्र, कोरोनाचे रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेतात १५ एप्रिलच्या रात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार शहरासह जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवारी ही सकाळी जीवनाश्यक वस्तू भाजीपाला आणि अन्य साहित्याच्या खरेदीसाठी शहर परिसरात बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ दिसून आली. मात्र, दुपारनंतर शहर व परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. तुरळक प्रमाणात रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू असल्याचे चित्र दिसत होते. बस थांब्यावर शुकशुकाट आहे.