अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता जरी कमी झालेला असला तरी फेब्रुवारी ते मेअखेरपर्यंत ७०,४६९ पॉझिटिव्ह व १,०४३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,५१६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. यामध्ये ३१ मे पर्यंत साधारणत: ८९७ महिलांना आपल्या कपाळावरील कुंकू पुसण्याचा दुदैवी प्रसंग कोरोनामुळे आलेला आहे. या महिलांना शासन योजनेचा लाभ मिळावा, यादृष्टीने आता महिला व बालविकास विभागाद्वारा सर्व्हे प्रारंभ करण्यात आलेला आहे.
शेतकरी आत्महत्याप्रवण असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात यंदा ७८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याने या महिलांवर वैधव्य आले असतानाच यात कोरोना संकटाने घाला घातला. या संकटामुळे जिल्ह्यातील ८९७ महिलांच्या कपाळावरील कुंकू हिरावल्याचा दुर्देवी प्रसंग ओढावलेला आहे. काळाने ही वेळ आणल्यामुळे या महिलांना शासनाधार देणे महत्त्वाचे आहे. काही महिलांची मुले कमावती असली तरी खरा आधार, हिंमत ही पतीचीच असते.
जिल्ह्यात ४ एप्रिलला पहिल्या कोरोना मृताची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे चक्र सुरूच आहे. तेव्हापासून ३१ मेपर्यंत जिल्ह्यात ९८७ पुरुष व ४६७ महिलांचे मृत्यू झाले व यामध्ये साधारणपणे १० टक्के मृत्यूमध्ये पती कोरोनामुळे हिरावल्याचा प्रसंग ओढावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या महिलांना आधार मिळावा व कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांची प्रत्यक्ष संख्या समोर यावी, त्यांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती व्हावी, या उद्देशाने आता जिल्ह्यात सर्व्हेक्षण सुरू झालेले आहे.
पाईंटर
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण : ९४,७५०
बरे झालेल्या रुग्णांची संख्या : ९०,६९८
उपचार सुरू असणारे रुग्ण : २,५३६
एकूण मृत्यू : १,५१६
महिलांचे मृत्यू (३१ मे पर्यंत) : ४६७
बॉक्स
येथे करावा अर्ज
कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांना स्वयंरोजगार मिळावा, त्यांना घरगुती उद्योग सुरू करता यावा, काही शासन योजनांचा लाभ मिळावा याकरिता महिला व बालकल्याण विभागाच्या तालुका व जिल्हा कार्यालयाकडे अर्ज करावा लागणार आहे. याशिवाय शासन योजनेच्या निकषानुसार पात्र महिलेला संजय गांधी निराधार योजना, भूमिहीन पेन्शन योजनांसह तत्सम योजनेच्या लाभासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.
कोट
प्रत्येक तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत याविषयीचा सर्व्हे करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्याचा डाटाबेस तयार होईल. यात पात्र महिलांना शासन योजना, स्वयंरोजगारासाठी अर्ज करता येणार आहे.
- प्रशांत थोरात,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण)
बॉक्स
७० महिलांना तारुण्यात वैधत्व
१) २१ ते ४० या वयोगटात साधारणपणे ८२ महिलांच्या कपाळावरील कुंकू कोरोना संसर्गाने हिरावले आहे. या महिलांना स्वयंरोजगारासाठी योजनेचा लाभ मिळणे व अर्थसहाय्य करावयास पाहिजे, अशी समाजभावना आहे.
२) ४१ ते ६० वयोगटात साधारणपणे ३२८ महिलांचा पती कोरोना संसर्गाने हिरावला आहे. या महिलांना शासनाधार मिळणे महत्त्वाचे आहे. या महिलांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन घरगुती उद्योगाला प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे.
३) ६० वर्षांवरील ४७७ महिलांच्या रथाचे एक चाक काळाने हिरावले. या महिलांना शासनाने निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा व यात कोणतीही अट नसावी, अशी मागणी आता समोर येत आहे.
४) कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांंचे समुपदेशन होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात तयार होत असलेल्या डाटाबेसनंतर या महिलांची सद्यस्थिती शासनासमोर आल्यानंतर काय धोरणात्मक निर्णय होते, याकडे लक्ष लागले आहे.