अमरावती : कोरोनाने ५१ बालकांचे पालक हिरावले. यामध्ये ४८ जणांनी वडील, सहा जणांनी आई, तर तिघांनी आई-वडील दोघेही गमावले आहेत. अशा निराधार झालेल्या बालकांची माहिती आरोग्य यंत्रणा व कृती दलाद्वारे जिल्हा प्रशासनास उपलब्ध केली. या बालकांच्या यथायोग्य संगोपनासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे काळजी घेतली जाणार आहे.
जिल्हा बाल कल्याण अधिकारी भूषण भंडांगे यांच्या मार्गदर्शनातील पथकाद्वारे मुलांचा शोध घेण्यात आलेला आहे. यातील सर्व बालके हे काका,काकू, आजी, आजोबा, मामा, मामी आदींकडे सध्या वास्तव्याला असल्याचे दिसून आले. अनाथ झालेली तीन मुले आजी-आजोंबाकडे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. ही मंडळी जर या बालकांना ठेवावयास तयार नसतील, तर त्यांना रुक्मिणीनगर व देसाईनगरातील बाल संगोपनगृहात ठेवण्यात येणार असल्याचे भडांगे यांनी सांगितले.
कोरोना विषाणूमुळे अनेक बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. अशा बालकांची काळजी व संरक्षण करीत त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन, त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्ह्यात कृती दल गठीत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार कोरोना प्रादुर्भाव काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील मुले तसेच कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यात येणार आहे.
पाईंटर
पिता गमाविलेले बालके : ४१
आई हिरावलेली बालके : ०६
आई-वडील दोघेही मृत झालेली बालके : ०३
बॉक्स
असा घेतला गेला बालकांचा शोध
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गावातील ग्राम समिती, अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटीद्वारे तसेच ५० वर्षांपर्यंतच्या मृत व्यक्तींचा डेटा जमा करण्यात आला. यानंतर त्या कुटुंबांशी संपर्क करण्यात आल्याचे बाल कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अशी सर्व बालके सुरक्षित आहेत व जर त्यांना सांभाळ कोणी करीत नसल्यास त्यांना बाल संगोपनगृहात ठेवले जाणार आहे.
बॉक्स
दरमहा १,१०० रुपयांची मदत
कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांचे माता, पिता किंवा दोन्ही हिरावले गेले, त्यांना शासनाकडून १,१०० रुपये दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण होईतोवर या बालकांना ही मदत मिळेल. यासाठी मृत पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, मुलाचा रहिवासी दाखला, छायाचित्र, आधार कार्ड व तहसीलदारांचे प्रमाणपत्र व बँक खातेक्रमांक द्यावा लागणार आहे.
कोट
कोरोना संसर्गामुळे ५१ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला. टास्क फोर्सद्वारे या मुलांचा शोध घेण्यात आला. या बालकांच्या यथायोग्य संगोपनाची काळजी घेतली जाणार आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी