वरूड : कोरोनाने वरूड तालुक्यात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केले आहे. कुठे सख्खे भाऊ, बाप-लेक, बहीण-भाऊ दगावले. तालुक्याबाहेर अमरावती, नागपुरात उपचार घेताना दगावलेल्या मृतांची नोंद कुठे आहे, असा प्रश्नदेखील यानिमित्त उपस्थित झाला आहे.
वरूड तालुका कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. अनेक घरांतील अनेक कर्ते पुरुष कोरोनाला बळी पडले. अनेक घरे ओस पडली, तर अनेकांवर निराधार होण्याची वेळ या कोरोनामुळे आली. तालुक्यात दरदिवसाला २०० ते ३०० कोरोना चाचणी केल्या जात होत्या. पैकी ७५ टक्के पॉझिटिव्ह दर होता. शहरात एका दिवशी ७० ते ८० रुग्ण काही दिवसांपूर्वी आढळून येत होते. सक्तीच्या लॉक डाऊनमुळे हा दार ओसरला. आता तीव्रता कमी झाली असली तरी कोरोनाचे भय संपलेले नाही. शेंदूरजनाघाट येथे एका कुटुंबावर कोरोनाने घाला घातला. आईवडिलांसह दोन तरुण मुलांचा बळी कोरोनाने घेतल्याने हुरमाडे कुुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पुसला येथे आहेर परिवारातील दोन सख्खे भाऊ, तर शिंगोरी येथे आईपाठोपाठ मुलाचा मृत्यू झाला.
नागरिकांनी सावध होण्याची गरज असून अकारण बाहेर फिरणे टाळणे गरजेचे आहे. याबाबत वारंवार सूचना करूनही लोकांची बाजारात झुंबड उडते. प्रशासनानेसुद्धा या विषयात हात टेकले आहेत.
दरम्यान, कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची यादी आरोग्य विभागाकडे असली तरी तालुक्यातील किती लोकांचा मृत्यू झाला, याबाबत नोंदी नसल्याचे सांगण्यात येते. नागपूर, अमरावती खासगी आणि शासकीय कोविड रुग्णालयात दगावलेल्या रुग्णांच्या नोंदी ना महसूलकडे, ना आरोग्य विभागाकडे आहेत. त्या नोंदी पाठविल्याच जात नाहीत, हे येथे उल्लेखनीय.