अमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख आता माघारायला लागला आहे. गुरुवारच्या चाचणीत ७.४७ टक्केच पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला. जिल्हा किंबहुना राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवातच अमरावतीपासूनच झाली. यात फेब्रुवारी महिन्यात १३,२३० पॉझिटिव्ह व ९२ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह १६४ मृत्यू, एप्रिल महिन्यात १६,६९४ पॉझिटिव्ह व ४१० मृत्यू झालेले आहेत. याशिवाय मे महिन्याच्या २७ दिवसांत उच्चांकी २३,८३३ पॉझिटिव्ह व ४३८ मृत्यू झालेले आहेत. मात्र, या पाच दिवसांत पॉझिटिव्हीटीत कमी आल्याने रोज नव्या रुग्णांची नोंद कमी येत आहे.
यंदा फेब्रुवारी महिन्यात राज्यात अमरावती जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या रोज वाढू लागल्याने येथील सात नमुने पुणे एनआयव्हीला तपासणीकरिता पाठविले असता, चार नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला. यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पुन्हा चार रुग्ण प्रकारातील प्रत्येकी २५ नमुने तपासणीला पाठविले असता, त्यामध्ये कोरोनाचा डबल म्युटंट व्हेरिएंट आढळून आल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले होते. यामध्ये संक्रमणाचा दर अधिक असल्याने कोरोनाग्रस्तांची संख्यावाढ झाल्याचे सांगण्यात आले.
पार्ईंटर
दिनांक पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी
२३ मे ६३७ ११.०१ टक्के
२४ मे ५४२ १५.३७ टक्के
२५ मे ५२५ १०.४१ टक्के
२६ मे ५२८ ८.६७ टक्के
२७ मे ४५५ ७.४७ टक्के
बॉक्स
ग्रामीणमध्ये कोरोनाचा स्फोट
जिल्हा ग्रामिणमध्ये एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये ७,१३४ पाॅझिटिव्ह व ६३३ मृत्यूची नोंद झाली व यंदा जानेवारी ते २६ मे पर्यंत ३९,६४६ पॉझिटिव्ह व ६३३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियम पाळले नसल्याने कुटुंबाचे कुटुंब पॉझिटिव्ह आलेले आहेत. याशिवाय लक्षणे अंगावर काढणे, कोरोना चाचणींना उशीर त्याचप्रमाणे लगतच्या जिल्ह्याशी संपर्क यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.