परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. परतवाडा व अचलपूर शहर वगळता तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर पाहावयास मिळत आहे. नुकतीच झालेली ग्रामपंचायत निवडणूक, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणारी तोबा गर्दी व लग्नप्रसंगातील मोठी उपस्थिती कोरोना संसर्गाला पूरक ठरल्याचे चित्र आहे.
अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांसह तालुक्यात मागील आठ दिवसांत १७५ च्या वर कोरोना रुग्ण आढळल्याने अचलपूर कुटीर रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. तेथे खाटा उपलब्ध नसल्याने अनेकांनी खासगी रुग्णालयाकडे, तर काहींनी होम आयसोलेशनला पसंती दिली आहे. ग्रामीण भागातील कांडली, देवमाळी, पथ्रोट, नारायणपूर, वडगाव फत्तेपूर, उपतखेडा, गौरखेडा कुंभी, नवसारी, जवर्डी, रामापूर, रासेगाव, परसापूर, खानजमानगरसह तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात हे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.
कोट :
अचलपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. डेडिकेटेड कोविड रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. नागरिकांनी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. डेडिकेटेड कोविड रुग्णालयातील या ३५ बेड व्यतिरिक्त ट्रामा केअरमधील १५ बेड कोरोना रुग्णांकरिता उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन सुरू आहे.
- डॉ. जाकीर, डेडिकेटेड कोविड रुग्णालय, अचलपूर