निधीची तरतूद नाही, शासकीय, प्रशासकीय विभागांना ‘टार्गेट’ नाही
अमरावती : दरवर्षी वृक्ष लागवड ही मोहीम म्हणून राबविली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे राज्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पावसाळ्यात प्रारंभ होणारी वृक्ष लागवड ही मोजक्या स्वरूपात राबविली जाणार आहे. निधीअभावी शासकीय, प्रशासकीय विभागांना वृक्ष लागवडीचे ‘टार्गेट’ देण्यात आले नाही, अशी माहिती आहे.
वनविभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्प यासह मोजक्याच यंत्रणेकडून १ जुलैपासून वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि, राज्य शासनाने वृक्ष लागवडीसाठी निधीची तरतूद केली नसल्याने वन विभागापुरतीच ही मोहीम राबविली जात आहे. युती शासनाच्या काळात माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविली. यात शासकीय, प्रशासकीय अशा ४४ विभागांना ‘टार्गेट’ देण्यात आले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकार येताच कोरोनाचे आगमन झाले आणि आजतागायत कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच वनखाते असतानाही वृक्ष लागवडीसाठी पुरेशा निधी नसल्याने मोजक्याच स्वरूपात वृक्ष लागवड केली जाणार आहे.
----------------
१ जुलैपासून वन महोत्सव, वृक्ष लागवड ऐच्छिक
राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले नसले तरी १ जुलैपासून वन महोत्सव राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या महोत्सवात वृक्ष लागवड करू इच्छिणाऱ्या यंत्रणा, सामाजिक संस्था, शासकीय व प्रशासकीय विभागांना नोंदणीनुसार रोपे दिली जातील. सामाजिक वनीकरण, वनविभागाकडे रोपांची नोंदणी करावी लागणार आहे. यंदा वृक्ष लागवड ऐच्छिक असल्याने वन विभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्प वगळता अन्य यंत्रणांमध्ये आनंद दिसून येत आहे.
--------------------
गतवर्षी ९५ हेक्टरमध्ये वृक्ष लागवडीबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास मान्यता प्रदान करण्यात आली असून, निधी देखील मिळाला आहे. अमरावती प्रादेशिक विभागात वृक्ष लागवड केली जाणार आहे. मात्र, वृक्ष लागवडीचे ‘टार्गेट’ नाही.
- चंद्रशेखरन बाला, उपवनसंरक्षक, अमरावती.
----------------
-