गजानन मोहोड
अमरावती : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढायला लागल्याने येथील ७७ नमूने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू परिक्षण परीक्षण प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेसींगसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ५३ नमुन्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. यामध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे नवे उत्परिवर्तन एक्सबीबी १.१६ या विषाणूचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मार्च महिन्यात ९९ व १ ते ११ एप्रिलपर्यंत ४६ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. या विषाणूचा संक्रमणदर यापूर्वीच्या विषाणूपेक्षा १६ टक्के जास्त असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. लक्षणे सौम्य असले तरी ज्यांनी लस घेतलेली नाही किंवा ज्या रुग्णांना सहव्याधीचे आजार आहेत. त्यांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परिक्षण प्रयोगसाळेचे समन्वयक डॉ प्रशांत ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील ५३७ संक्रमित रुग्णांचे जिनोम सिक्वेसिंग अहवाल प्राप्त झाल्याने संसर्ग कोणत्या विषाणूचा हे निष्पन्न झाले आहे व उपचारासाठी देखील सोईचे होणार आहे. जिल्ह्यात संक्रमित रुग्णांचे नमूने संकलन कमी प्रमाणात होत असल्याने ते वाढविण्याची आवश्यकता आहे. याद्वारे रुग्णांची नोंद होऊन त्यांच्यावर उपचार करता येणार आहे. लसीकरण झालेल्या रुग्णांना संसर्गाचे सौम्य लक्षणे असल्याने काळजी नसली तरी बूस्टर डोस घेणे व पंचसूत्रीचे पालन करणे महत्वाचे आहे.