अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सिपना व परतवाडा वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक कोरोना संक्रमित आढळून आले आहे. परिणामी या दोन्ही प्रमुख वन अधिकाऱ्याच्या क्षेत्रीय कारभार सहायक वनसंरक्षक के.एस. पाटील यांच्याकडे असणार आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांनी निर्गमित केला आहे.
सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार, परतवाडा वन्यजीव विभागाच्या विभागीय वन अधिकारी पियूषा जगताप हे दोन्ही वन अधिकारी कोरोना संक्रमित आढळून आल्याने ते क्वारंटाईन आहेत. त्यामुळे सिपना वन्यजीव विभाग परतवाडा आणि मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा अंतर्गत सर्व कार्यालयीन तसेच क्षेत्रीय कामकाज सहायक वनसंरक्षक के.एस. पाटील हे पुढील आदेशापर्यंत सांभाळतील, असे आदेशाद्धारे स्पष्ट करण्यात आले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत कोरोनाचा शिरकाव झाल्याने अन्य क्षेत्रीय कर्मचारी हादरून गेले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी वजा वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात येणार आहे