संदीप मानकर - अमरावती : लॉकडाऊनमध्ये कोरोनाने अनेकांचा रोजगार हिरावला. परिणामी कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली. गतवर्षी पोलीस आयुक्तालयातील महिला सेलकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या ६२४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील काही नोकरी गमावलेल्या पतीच्या मारहाणीच्या शिकार ठरल्या आहेत.
महिला सेलकडे दाखल झालेल्या ६२४ प्रकरणांपैकी पती-पत्नीचा समेट घडवून आणून ४२५ प्रकरणांत संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवून देण्यात पोलिसांना यश आले. मात्र, २९ प्रकरणांमध्ये भादंविचे कलम ४९८ अन्वये गुन्हा नोंदविण्यासाठी प्रकरण संबंधित ठाण्यात पाठविण्यात आले. २०१९ या वर्षात कौटुंबिक कलहाची ६६६ प्रकरणे पोलिसांकडे आली होती. २०२१ मधील दोन महिन्यांत १२१ प्रकरणे पोलिसांकडे आली. त्यापैकी १५ प्रकरणे निकाली काढली आहेत.
बॉक्स:
नोकरी गेली म्हणून माहेरहून पैसे आणण्याचा तगदा
लॉकडाऊनमध्ये पुण्या-मुंबईची नोकरी गमावून अनेक तरुण गावी परतले. येथे नवा व्यवसाय थाटण्यासाठी पत्नीकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी तगदा लावल्याची काही प्रकरणे महिला सेलपुढे आली होती.
-----------
४२५ प्रकरणांत मध्यस्थी
महिला सेलमध्ये तक्रारदार पत्नी व पती या दोघांनाही बोलावून त्यांच्या येथील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समुपदेशन केले. त्यानंतर ४२५ जणांचा पुन्हा संसाराची घडी पूर्ववत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यासाठी पोलिसांनी कसब पणाला लावले.
काय सांगते आकडेवारी?
२०१९ मध्ये नोंदविलेली प्रकरणे - ६६६
२०२० मध्ये नोंदविलेले प्रकरणे - ६२४
जानेवारी, फेब्रुवारी २०२१ मध्ये नोंदविलेले प्रकरणे - १२१