अमरावती : येथील एका खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी १२ दिवसांत चार लाखांची देयके आकारण्यात आली. याप्रकरणी रुग्णांच्या नातेवाईंकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, एका तोशी नामक इंजेक्शनचे चक्क ३९ हजार रुपये बिलात आकारल्याचे नमूद आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना १२ एप्रिल रोजी अजय पांडुरंग शेंदूरकर यांनी तक्रार नोंदवून खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईंकांची लूट चालविली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पांडुरंग शेंदूरकर हे ११ ते २३ मार्च दरम्यान कोरोना चाचणी केल्यानंतर खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले. तीन दिवसांनी अहवाल संक्रमित आला. मात्र, या १२ दिवसांत पाच रेमडेसिविर तर ताेशी नामक एक इंजेक्शन देण्यात आल्याचे देयकात नमूद आहे. रुग्णाला भरती करताना सिटीस्कॅन स्कोअर १२ एवढा होता. मात्र, उपचारानंतर २१ स्कोअर कसा झाला? हेच कळले नाही, असा सवाल तक्रारकर्ते अजय शेंदूरकर यांनी उपस्थित केला आहे. या खासगी रुग्णालयात उपचार व्यवस्थित होत नसल्याची कैफियत मृत्युपूर्वी पांडुरंग शेंदूरकर यांनी मांडली होती, असे म्हटले आहे. माझ्या वडिलांना कोणत्या प्रकारची औषधे दिले जाते, याची रुग्णालयातून पूर्वकल्पना देण्यात आली नाही, असे अजय यांचे म्हणणे आहे. या खासगी दवाखान्यात होणारी लूट आणि रुग्णांसोबतही हेळसांड बघता मध्येच उपचार बंद करून डिस्चार्ज घेतला. वडिलांना हृदयाचा त्रास असल्याने त्यांना पुन्हा एका खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यानंतर २७ मार्च रोजी निधन झाले. मात्र, काेरोनाच्या नावाने खासगी दवाखान्यात कशी आर्थिक लूट होत आहे, याची त्रयस्थ चौकशी करावी, अशी मागणी अजय शेंदूरकर यांनी केली आहे.