वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ आरोग्य विभागाला दिले, आॅक्सिजन काॅन्सनट्रेटर, मास्क व सॅनिटायझर भेट;
पाच मुलींनी जपली सामाजिक बांधिलकी
चांदूरबाजार : कोरोनाने निधन झालेल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलींनी ग्रामीण आरोग्य यंत्रणेला कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय साहित्य भेट दिले. वडिलांच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून पाच बहिणींनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशा प्रकारे कोरोनाने निधन झालेल्या पित्याला, मुलींनी अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. कोरोनाने वडील गेल्याच्या दु:खातही त्यांनी नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
या पाच मुलींचे वडील प्रभाकर सावळे यांचे दोन महिन्यांपूर्वी अमरावती येथील खासगी रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. त्यावेळी त्यांच्या पाचही मुलींनी कोरोना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास जवळून पाहिला. याचा विचार करून त्यांच्या मुलींनी एक लाख रुपयांचे वैद्यकीय साहित्य, चांदूर बाजारच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेला भेट दिले. यात एक ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर,२५ ऑक्सिमीटर, ५०० मेडिकल मास्क, १५० एन-९५ मास्क, तसेच एक लिटर सॅनिटायझरचे दोन बाॅक्सचा समावेश आहे.
अशाप्रकारे सामाजिक बांधीलकी जपून मृत्यूनंतरही आपल्या वडिलांचे समाजऋण फेडून एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. मृत्यूनंतरही वडिलांना मुलींचा हेवा वाटावा, असे महान कार्य सीमा कट्यारमल, अर्चना मगरदे, ज्योती लोहकपुरे, स्मिता बासोळे, मनीषा सावळे यांनी केले आहे.
हे सर्व वैद्यकीय साहित्य २४ मे रोजी तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्सना भगत यांनी तहसीदार धीरज स्थूल व गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरखडे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात स्वीकारले. यावेळी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. रुपेश बुरखंडे, जि.प. सदस्य श्याम मसराम, संतोष सावळे, राजाभाऊ दाभोलकर आदी उपस्थित होते.