अमरावती : कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील आठ क्षेत्र आणि ग्रामीणमध्ये चार शहरे कोरोना पॉकेट्स म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी जाहीर केले आहे. संक्रमित रुग्ण आढळत असलेल्या या भागात आशा वर्करच्या माध्यमातून कोरोनाबाबतची ‘डोअर टू डोअर’ तपासणी केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी नवाल यांनी जिल्ह्यात वाढता कोरोनाच संसर्ग लक्षात घेता आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रपरिषदेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. शासन मार्गदर्शक तत्त्वानुसार त्रिसूत्रीचे पालन व्हावे, यासाठी महापालिका प्रशासन आणि चार उपजिल्हाधिकाऱ्यांचे पथक कार्यवाही करणार आहे. मास्कचा वापर, शारीरिक अंतर, गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी नागरिकांची जनजागृती केली जाणार आहे. कार्यवाहीसाठी सार्वजनिक गर्दीचे स्थळ लक्ष असणार आहे. केंद्रीय आरोग्य पथकाच्या निर्देशानुसार निश्चित केलेल्या कोरोना पॉकेट्स या भागांवर आता फोकस असणार आहे. घरोघरी सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, संशयित रुग्णाची शोधमोहीम घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मास्कचा वापर ही जीवनशैली असावी, यासाठी भर देण्यात येणार आहे. स्वयंसुरक्षा, कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनांचे मार्गदर्शन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला महापालिका आयुक्त प्रशांत रोडे उपस्थित होते.
------------------------
शहरात हे आहेत आठ कोरोना पॉकेट्स
रुख्मिणीनगर, राजापेठ- बेलपुरा, राठीनगर, कठोरा नाका, साईनगर, कॅम्प, अंबिकानगर, रहाटगाव
----------------------
ग्रामीण भागात हाय रिस्कमध्ये ही चार शहरे
अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूर बाजार, वरूड
-----------------------
कोराेना का वाढला? जिल्हाधिकारी अनभिज्ञ
फेब्रुवारी महिन्यात गत १० दिवसात २ हजार १९ संक्रमित रुग्ण आढळले तर, १० रुग्णांचा बळी गेला. कोरोना संसर्गाचा उद्रेक का वाढला? यासंदर्भात जिल्हाधिऱ्यांना विचारणा केली असता हा संशोधनाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना त्रिसूत्रीचे नागरिकांनी पालन केले नाही तर पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचा प्रसंग येईल, असे संकेत त्यांनी दिले. सार्वत्रिक गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमावलींचे पालन व्हावे, यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.