अमरावती : कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीने कहर केला आहे. रविवारी पुन्हा ३९९ पॉझिटिव्ह आले, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत २५ हजार २९४ संक्रमितांची नोंद झाली, तर मृतांची संख्या ४३५ झाली आहे. १० फेब्रुवारीपासून सातत्याने तीन शतकी रूग्णसंख्येने अमरावतीकरांमध्ये भीती व्यक्त होत आहे.
नवीन वर्षात जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना संक्रमितांच्या संख्येत बेफाम वाढ होत आहे. फेब्रुवारीत यात अधिक भर पडली आहे. विशेषत: कोरोनाने ज्येष्ठ नागरिकांचे बळी घेतल्याची आकडेवारी आहे. अमरावती शहरात संक्रमितांची संख्या वाढीस लागली असून, महापालिका प्रशासनाने गृह विलगीकरण रुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु, दरदिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा हैराण झाली आहे.
------------
आतापर्यंत ४३५ मृत्यू
मार्चपासून तर आतापर्यंत ४३५ कोरोना संक्रमित रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. रविवारी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात अमरावती येथील कृष्णार्पण कॉलनीतील ६४ वर्षीय पुरुष, राजापेठ येथील नरहरीनगरातील ८४ वर्षीय पुरुष, तर प्रसादनगरातील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
---------------------
त्रिसूत्रीचे पालन विसरले
कोरोना लस येताच, नागरिक त्रिसूत्रीचे पालन करणे विसरले आहेत. केवळ ५ ते १० टक्केच नागरीक मास्कचा वापर करतात. शारीरिक अंतराचे पालन कुठेही दिसून येत नाही. बाजारपेठेतील गर्दी बघता, कोरोनाचा स्फोट होण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू झाली आहे. नियमित हात धुणे तर आता बंदच झाले आहे. कोरोना वाढीस बहुधा नागरिक जबाबदार असल्याचे एकंदर चित्र आहे.
----------
मृत्युदर १.८६ टक्के
आतापर्यंत निष्पन्न झालेल्या २५ हजार २९४ संक्रमितांपैकी कोरोनाने ४३५ जणांचा बळी घेतला. हा मृत्युदर १.८६ टक्के असा आहे. मृतांमध्ये वयस्कर व्यक्ती व वृद्धांची संख्या अधिक आहे.
----------------
कॉलन्यांमध्ये संसर्गाची भीती
शहरातील कॉलनी, अपार्टमेंट यात कोरोना पॉझिटिव्ह जादा आढळून येत आहेत. त्याच्या तुलनेत मागास नागरी वस्त्यांमध्ये कोरोनाग्रस्त आढळून येण्याची संख्या कमी आहे.
--------------
रविवारी यंदाचा उच्चांक
नवीन वर्षात १४ फेब्रुवारीपर्यंत रविवारी निष्पन्न झालेला कोरोनाग्रस्तांचा ३९९ हा आकडा सर्वाधिक आहे. १० ते १४ फेब्रुवारी या दरम्यान पाच दिवसांत १८१८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
-------------------
एकूण पॉझिटिव्ह- ३९९
दाखल रुग्ण - ५११
बरे होऊन घरी परतले- ३७४
महापालिका क्षेत्रात गृह विलगीकरण - २२५
ग्रामीण क्षेत्रात गृह विलगीकरण - ३६९
ॲक्टिव्ह रुग्ण - ११०५
रिकव्हरी रेट - ९३.९१
डबलिंग रेट- २६६.१
एकूण नमुने - १ लाख ९३ हजार ४६४