ई-पाॅस मशीनवर अंगठा लावणे बंधनकारक करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मे महिन्यात जिल्ह्यात मोफत धान्य मिळणार आहे. मात्र, त्यासाठी रेशनकार्डधारकांना ई-पॉस मशीनवर अंगठा लावावा लागणार आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. यात आता दुकानदारदेखील अडचणीत येणार आहेत. याआधी जिल्ह्यातील काही दुकानदार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे त्यांनीही ई-पाॅस मशीनवर अंगठा लावणे बंधनकारक असू नये, अशी मागणी केली आहे. यासह आणखी काही मागण्यांसाठी जिल्ह्यासह राज्यभरातील दुकानदार संपावर गेले आहेत. राज्य शासनाने मोफत म्हणून जाहीर केलेले धान्य आता एप्रिलऐवजी मे महिन्यात दिले जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू घटकांची गर्दी नक्कीच होणार आहे. हे धान्य घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागतील. या गर्दीत कोरोना आणखी वाढण्याचा धोका आहे. धान्य घेण्यासाठी नागरिकांना ई-पाॅस मशीनवर आपला अंगठा द्यावा लागणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका पोहोचू शकतो. त्यात प्रत्येक रेशन दुकानदाराला एवढ्या मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध करून देणे शक्य होईल का, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
बॉक्स
या आहेत रेशन दुकानदारांच्या मागण्या
राज्यात आतापर्यंत १२३ रेशन दुकानदारांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत द्यावी, स्वस्त धान्य दुकानदारांना ५० लाखांचे विमा सुरक्षाकवच द्यावे, लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिकची सक्ती करू नये, स्वस्त धान्य दुकानदाराचे आधार प्रमाणित करून धान्य वाटपाची मुभा द्यावी, वाधवा समितीच्या अहवालाप्रमाणे मानधन द्यावे, दुकानदारांना महसूल चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, अशा मागण्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केल्या आहेत.
बॉक्स
रेशन दुकानावर सॅनिटायझर राहणार का?
एका दुकानदाराकडे जवळपास दीड ते दोन हजारांच्या आसपास ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी सॅनिटायझर ठेवणे दुकानदाराला परवडणारे नाही. शासन रेशन दुकानदारांना सॅनिटायझर किंवा मास्क देत नाही. रेशन दुकानदारांचे अद्याप लसीकरणदेखील करण्यात आलेले नाही.
बॉक्स
रेशन दुकानदारांची संख्या - १९१३
महापालिका क्षेत्रात - १६१
ग्रामीण क्षेत्रात - १७५२
जिल्ह्यात रेशन दुकान - १९१३
एकूण रेशनकार्डधारक - ४०७६२६
पीएचएस - २८५७८२
अंत्योदय - १२२८४४
केशरी - ८००२८
कोट
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, शासनाच्या सूचनेप्रमाणे रेशन दुकानदारांना स्वत:चा अंगठा लावून धान्य वितरणाबाबत सूचना दिल्या आहेत. यापूर्वी रेशन दुकानदारांना सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आला हाेता.
- अनिल टाकसाळे
जिल्हा पुरवठा अधिकारी