चांदूर रेल्वे : व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. तथापि, पालिकेच्या व अन्य कर्मचारी अमरावतीसारख्या ‘हॉट स्पॉट’हून येजा करत असताना त्यांच्यासाठी वेगळा न्याय आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित करून व्यापारी संघटना आक्रमक झाली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या अप-डाऊनमुळे चांदूर रेल्वेत कोरोनाचा अधिक प्रसार होण्याची शक्यता आता स्थानिक व्यापारी संघटनेने वर्तविली आहे. सर्व कर्मचाऱ्यांची कोविड चाचणीकरून मुख्यालयी राहण्याची सक्ती करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमेरचंद जैन यांच्या नेतृत्वात देण्यात आला. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
व्यापाऱ्यांच्या चाचणीसाठी दिलेला कालावधी ५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात यावा, अशी मागणीसुद्धा करण्यात आली. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी राजू खांडपासोळे, राहुल जैन, पंकज केशरवानी, संजय जैन, अमोल गवळी, मदन कोठारी, गोपाळराव वाघ, सुनील मालखेडे, छोटू विश्वकर्मा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
-------------