लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटात लोकांना कोरोना होत नाही. येथील लोकांची रोगप्रतिकारक क्षमता खूप जास्त आहे , त्यामुळे कोरोना जवळपास भटकू शकत नाही, असा अतिआत्मविश्वासाचा दावा येथील काहीजण करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात धारणी तालुक्यातही कोरोनाने पाय पसरल्याची वस्तुस्थिती आहे.आजमितीस अनेक लोकांनी सामाजिक अंतर ठेवणे टाळले असून अनेकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे सुद्धा बंद केले आहे. परिणामी कोरोनाने येथील सर्वसामान्यांवर आक्रमण केल्याचे चित्र आता हळूहळू दिसू लागले आहे .
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धारणी तालुक्यात आतापर्यंत ५५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचेवर स्थानिक कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. धारणी शहरात बाधित काही रुग्णांनी बाहेर गावी जाऊन उपचार घेतले. स्थानिक एक व्यावसायिकाला कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे अकोला येथे उपचार सुरु होते.गेल्या आठवड्यात त्यांचा तेथेच मृत्यू झाला. अंतिमसंस्कार अकोला येथे करण्यात आले आहे. शहरात याची वाच्यता झाली नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन तरी तालुका व शहरवासियांनी सजग राहणे आवश्यक झाले आहे.ताप, सर्दी, खोकला झाल्यास कोविड सेंटर येथे येऊन तपासणी करून घेण्याचे निवेदन वारंवार करण्यात येत आहे. धारणीत कोरोना तपासणीचे प्राथमिक निदान करण्यात येऊन त्यांचेवर योग्य उपचार केल्यानंतर सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे योग्य वेळी दखल घेऊन स्वत:हून तपासणी केल्यास रोगमुक्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत ५५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.- शशिकांत पवारतालुका आरोग्य अधिकारी, धारणी