अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील नागपुरीगेट परिसरात असलेल्या बेस्ट मल्टिस्पेशालिटी कोविड हॉस्पिटल येथे २२ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या अचलपूर येथील महिलाचा शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कोरोनाने मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी केलेला हलगर्जीपणामुळे महिला दगावली. नातेवाईकांनी आरोप करीत हॉस्पिटलमध्ये कोविड कक्षात जाऊन काचा तोडफोक केल्याची घटनेने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी डॉक्टरांविरुद्ध महिलेच्या पतीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविल्याचे पोलिसांनी सांगितले.
शबाना अंजूम (४५, रा. अचलपूर) असे मृतक महिलेचे नाव असून २७ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी ९.३० वाजताच्या सुमारास महिला दगावली. त्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास नातेवाईक संतप्त झाले. हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली. त्यानंतर काही नातेवाईकांनी व सामजिक कार्यकर्यांनी संतप्त होत डॉक्टर सोहेल बारी व हॉस्पिटल प्रशासनावर संताप व्यक्त करीत हॉस्पिटलमधील काचा फोडून तोडफोड केली. पोलिसांना माहिती मिळताच गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. तसेच क्युआरटी पथकसुद्धा घटनास्थळावर दाखल झाले. गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक मोहन कदम व पोलिसांच्या ताफ्याने घटनास्थळावर नियंत्रण मिळविले. नातेवाईकांची समजूत काढून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आला. त्यानंतर नागरिक शांत झाले.
कोट
२२ दिवसांपासून महिलेवर उपचार सुरू आहे. महिलेची प्रकृती आधीपासूनच चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर लावले होते. आम्ही महिलेला वाचविण्याचे पूर्ण प्रयत्न केले. तोडफोड ही नातेवाईकांनी नाहीतर बाहेरील लोकांनी केली. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविणार आहे.
- डॉ. सोहेल बारी, संचालक बेस्ट हॉस्पिटल अमरावती