रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्याना निर्बंध
धामणगाव रेल्वे : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार कमी होत असला तरी धामणगाव तालुक्यातील आकडे कमी होण्याचे नाव घेत नसल्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्या तब्बल ८०० जणांची कोरोना चाचणी एकाच दिवशी घेण्यात आली.
धामणगाव तालुक्यात आतापर्यंत सुमारे अडीच हजार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. अनेक गावे आजही प्रभावित आहेत. सकाळी ११ नंतर धामणगाव रेल्वे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर निर्बंध असतानाही रिकामटेकड्याची संख्या अधिक वाढली आहे. त्यांना पायबंद घालण्यासाठी बुधवारी ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने अमर शहीद भगतसिंग चौक, शास्त्री चौक, कॉटन मार्केट चौक, पोलीस स्टेशन परिसर, शिवाजी चौक आदी ठिकाणी कोरोना चाचणी शिबिर लावण्यात आले. दत्तापूरचे ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांनी आपले पोलीस पथक लावून दुपारी १२ नंतर शहरात रस्त्यावर दिसलेल्यांना पकडून त्यांच्या कोरोना चाचणी घेण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे, राजेंद्र जगताप, प्रशांत जोशी, रवि कोलटके, अस्मित चौधरी, संदेश इंगळे, आरती मेश्राम, नितीन कळंबे, शिल्पा मेहरे यांनी दिवसभर कोरोना चाचणी घेण्यासाठी अथक परिश्रम घेतले.