बडनेरा : महापालिका प्रशासनाच्यावतीने बडनेऱ्यात बॉर्डर सीलिंग पॉईंटवर शुक्रवारी ५३ वाहनचालकांची कोरोना आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली. संसर्ग रोखण्यासाठी ही मोहीम प्रशासनाकडून राबविली जात आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त वाढतच आहेत. त्याला रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. बसस्थानकाजवळील बॉर्डर सीलिंग पॉईंट येथे महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाच्या कोविड तपासणी पथकाकडून वाहनचालकांची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली. या मोहिमेत महापालिका, बडनेरा पोलिसांच्या वाहतूक शाखेचा सहभाग होता. नियम मोडून जिल्ह्यात शिरणाऱ्या वाहनचालकांना दंडदेखील आकारण्यात आला.
बडनेरा येथील बॉर्डर सीलिंग पॉईंटला यवतमाळ, अकोला, वाशिम या तीन जिल्ह्यांना जाणारा मार्ग जोडलेला आहे. या सीमेवरून मोठ्या संख्येने वाहतूक जिल्ह्यात व बाहेर जात असते. बॉर्डर सीलिंग पॉईंटवर ही मोहीम नियमितपणे राबविल्यास संसर्ग रोखण्यास प्रशासनाला मोठी मदत मिळू शकते. विविध कारणे दाखवून बाहेरून बरीच वाहने जिल्ह्यात दाखल होत असल्याची परिस्थिती आहे. रस्त्यावर विनाकारण वाहनचालकांचा राबतादेखील कोरोना चाचण्यांमुळे कमी होऊ शकतो, हे वास्तव आहे.