फोटो पी २० चांदूर बाजार
चांदूर बाजार : तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. यात मंगळवारी नगरपालिका आरोग्य विभाग, तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे संयुक्त कारवाई करण्यात आली. यात येथील जयस्तंभ चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या दरम्यान सगळे रिपोर्ट निगेटिव्ह आढळले आहे.
जिल्ह्यासह तालुक्यात वाढती रुग्णसंख्या पाहता, जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र, या आदेशाला न जुमानता बाजारपेठेत अनेक नागरिक मुक्त संचार करताना दिसत होते. यावर तालुका प्रशासनाने कठोर पावले उचलत पालिका प्रशासन तसेच पोलीस पथकासह जयस्तंभ चौक येथे ‘ऑन द स्पॉट’ कोरोना चाचणी करण्यात आली.
प्रशासनाचे नियम पायदळी तुडवून विनाकारण बाजारपेठेमध्ये मुक्तसंचार करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी पकडून त्या नागरिकांची जयस्तंभ चौक येथेच कोरोना चाचणी घेण्यात आली. यावेळी अनेक नागरिक सैरावैरा पळू लागले, तर अनेकांनी आपली वाहने गल्लीबोळीतून वळविली. यानंतरही पोलिसांनी विनाकारण बाजारपेठेमध्ये फिरणाऱ्या ४० जणांची कोरोना चाचणी केली. ही कारवाई तहसीलदार धीरज स्थूल यांचा मार्गदर्शनात नायब तहसीलदार देवेंद्र सवई यांचा उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पालिकेच्या आरोग्य प्रशासनतर्फे परिमल देशमुख, राजेंद्र जाधव, संतोष डोळेसह आरोग्य व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते. तालुका प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.