अमरावती : विद्यापीठाच्या लॅबद्वारा बुधवारी दुपारी आलेल्या १९ पॉझिटिव्ह अहवालाने शहराला हादरा बसला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने संक्रमित रुग्णांचे अहवाल प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १३४ झालेली आहे. याव्यतिरिक्त धामणगाव तालुक्यातील तीन रुग्णांचे अहवाल वर्धा जिल्ह्यात व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील सात वर्षीय बालकाचा अहवाल मध्यप्रदेशातील इंदूर येथे पॉझिटिव्ह आलेला आहे.
बुधवारी प्राप्त अहवालानुसार, येथील नवे हॉटस्पॉट असलेल्या मसानगंज येथे आणखी सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या कंटेनमेंटमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या २० झालेली आहे. या व्यतिरिक्त शिवनगर येथे दोन, पाटीपुरा येथे दोन, सिंधूनगर, रहमतनगर, बेलपुरा, पॅराडाईज कॉलनी, चेतनदास बगिचा, प्रबृद्ध विहार, पार्वतीनगर व नांदगाव पेठ येथे प्रत्येकी एक कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे.बुधवारी प्रबुद्ध विहार, बेलपुरा, शिवनगर, बजरंग टेकडी (मसानगंज परिसर) या चार नव्या भागांत कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने महापालिका आयुक्तांद्वारा हे चार नवे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले.