अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची जबरदस्त लाट आलेली आहे. या लाटेने मंगळवारी पुन्हा तडाखा दिला. ११ महिन्यांच्या संसर्ग काळात मंगळवारी उच्चांकी ९२६ कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने जिल्ह्यात आता समूह संक्रमणाचा धोका निर्माण झालेला आहे. सद्यस्थितीत संक्रमित रुग्णांची संख्या ३१,१२३ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा रोज होणारा ब्लास्ट पाहता कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्याचे आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २२ दिवसांतच यापूर्वी सप्टेंबरमधील ७,३०० कोरोनाग्रस्तांचा उच्चांक मोडीत काढला आहे. मंगळवारी २,४७२ चाचण्या करण्यात आल्या. यात ३७.४५ टक्के पॉझिटिव्हिटी असल्याची नोंद झाली आहे. तसे पाहता फेब्रुवारी महिन्याच्या २३ दिवसांत ९,१४४ कोरोनाग्रस्तांची धक्कादायक नोंद झालेली आहे. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २१ हजार कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने समूह संक्रमणाचा धोका निर्माण झालेला आहे. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे व स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे.
महापालिका क्षेत्रासह लगतचा परिसर, गुरुकुंज मोझरी तसेच अचलपूर नगरपालिका क्षेत्र व लगतचा परिसर आता प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेला आहे. यासह अनेक हॉट स्पॉट जिल्ह्यात निर्माण झालेले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने लक्ष केंद्रित करून कठोर उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
बॉक्स
शहरातील दोन हॉस्पिटलला महापालिकेची नोटीस
येथील दोन खासगी हॉस्पिटलमध्ये महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने भेट दिली असता, रुग्णांना रेमडीशिवर हे इंजेक्शन देण्यात आलेले आहे व कोरोनाशी साम्य असणारे रुग्ण उपचारार्थ दाखल असल्याचे आढळून आले. याशिवाय आयपीडीसी रजिष्टरमध्ये नोंदी अपूर्ण असल्याने या दोन्ही रुग्णालयांना खुलासा मागविण्यात आला आहे.
बॉक्स
जिल्हाधिकारी कार्यलयात ब्लास्ट
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह अन्य पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने एकच गहजब झालेला आहे. अनेकदा नागरिकांकडून निवेदन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. याशिवाय जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना अभ्यागतांची कुठलीही तपासणी होत नसल्याने कर्मचारीवृंदात चिंता व्यक्त होत आहे.
पाईंटर
कोरोना ब्लास्ट
१७ फेब्रुवारी : ४९८
१८ फेब्रुवारी : ५९७
१९ फेब्रुवारी : ५९८
२० फेब्रुवारी : ७२७
२१ फेब्रुवारी : ७०९
२२ फेब्रुवारी : ६७३
२३ फेब्रुवारी : ९२६