अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गत दोन आवड्यांपूर्वी ग्रामीण भागातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील निवडक ठिकाणी कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर आता जिल्ह्यातील ३३० आरोग्य उपकेंद्रांपैकी १५ उपकेंद्रांत काेविड लसीकरणाची सोय नागरिकांना उपलब्ध करून दिली.
पहिल्या फळीतील कोविड योध्दानंतर अतीजोखमीच्या व्यक्ती तसेच वयोवृद्धांना कोरोना लस देण्याचे शासनाने निश्चित केल्यानंतर सध्या जिल्ह्यात प्रत्यक्ष लसीकरण केले जात आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होऊ नये, या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यापाठोपाठ आता २५ मार्चपासून जिल्हाभरातील ३३० आरोग्य उपकेंद्रांपैकी पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणी कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. टप्प्याटप्प्याने जास्तीत जास्त आरोग्य उपकेंद्रात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोना लसीचा स्टाॅक जसजशी उपलब्ध होईल त्यानुसार उपकेंद्रात लसीकरणाची सोय नागरिकांसाठी करून दिली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सदरची लस ही शासनाने व जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार दिली जात आहे.
बॉक्स
या उपकेंद्रात लसीकरण सुरू
अचलपूर तालुक्यातील रासेगाव, चांदूर रेल्वेतील मालखेड, धामणगाव रेल्वेतील झाडगाव, दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई, अडुळा बाजार, एंडली, अमरावतीतील यावली शहीद, बाेरगाव धर्माळे, अंजनगाव सुर्जीतील कसबे गव्हाण, चिचोंली रहिमापूर, भातकुलीतील गणोजा देवी, खारतळेगाव, तिवसा तालुक्यातील सालोरा, नांदगाव खंडेश्र्वरमधील कोहळा जटेश्र्वर, मोर्शीतील रिध्दपूर आणि वरूड तालुक्यातील जरूड आदी १५ आरोग्य उपकेंद्रांत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे.
कोट
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पीएचसीत लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी