अमरावती : पहिल्या फळीतील कोविड योध्दांनंतर अतीजोखमीच्या व्यक्ती तसेच वयोवृद्धांना कोरोना लस देण्याचे शासनाने निश्चित केले. त्यानंतर सध्या जिल्ह्यात प्रत्यक्ष लसीकरण नाही केली जात आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होऊ नये, या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील ५९ पैकी पहिल्या टप्प्यात बुधवार, १० मार्चपासून १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली. उर्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात येत्या मंगळवारनंतर लसीकरणाचे नियोजन केले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात काही खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी लसीकरणासाठी नागरिकांना २५० रुपये मोजावे लागणार आहे. शासकीय रुग्णालयात मात्र ही लस मोफत दिली जात आहे. सध्या लसीकरणाचे काम शहरी भागात सुरू झाल्यानंतर लगेचच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय ज्येष्ठ नागरिकांसाठी करून देण्यात आली. याकरिता संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीसोबतच आवश्यक बाबीचाही पुरवठा आरोग्य विभागाने केलेला आहे. पहिल्या टप्प्यात १९ आरोग्य केंद्रांत लसीकरणास प्रारंभ झाला असून लस उपलब्ध होताच अन्य आरोग्य केंद्रातही कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी लोकमतला दिली. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता चाचणीसाठी ग्रामीण भागात शिबिरे घेतली जात आहेत. ज्या नागरिकांना आजाराबाबतचे लक्षण आढळून येतात अशा नागरिकांना जवळच्या चाचणी केंद्रावर चाचणी करून घ्यावी, तसेच कोरोना लसीकरणासाठी ज्यांनी नोंदणी केली आणि लस घेण्यास पात्र आहे, अशा नागरिकांनी संबंधित लसीकरण केंद्रावर लस टोचून घेण्याचे आवाहन झेडपी प्रशासनाने केले आहे.
बॉक्स
या आरोग्य केंद्रात लसीकरणास प्रारंभ
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित जिल्हाभरात ५० प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पहिल्या टप्प्यात अंजनगाव बारी, वलगाव, नांदगाव पेठ, खोलापूर, गणोरी, येवदा, रामतिर्थ, साद्राबाडी, कलमखार, पथ्रोट, धामनगाव गढी, पापळ, कोकर्डा, नेरपिंगळाई, काटकुंभ, तळवेल, घुईखेड, पळसखेड, निबोली, कुऱ्हा, मंगरूळ चव्हाळा आदी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरू केलेले आहे.
कोट
झेडपी आरोग्य विभागाने सर्वच आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणा करण्याबाबत नियोजन केले आहे. पहिल्याप्प्प्यात १९ केंद्रात ही सुविधा सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत सर्व ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केले जातील.
- अमोल येडगे,
मुख्यकार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद