अमरावती : कोरोना लसीकरणाची प्रत्यक्ष प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होत असल्याने १७ जानेवारीला असणारी पल्स पोलिओ लसीकरण पुढील आदेशापर्यंत बारगळले आहे. महापालिका क्षेत्रात या अभियानाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम १३ शहरी आरोग्य केंद्रांमार्फत राबविण्यात येणार होती. शहरात ६६ हजार ८९० बालके लाभार्थी आहेत. यामध्ये ३३२ पल्स पोलिओ बूथ, ८३७ मनुष्यबळ, ६५ बूथ सुपरवायझर व ८९७ एकूण बूथवरील कार्यकर्ते निश्चत करण्यात आले असताना, मोहीम बारगळल्याने पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, नवजात अर्भकापासून ते पाच वर्षे वयापर्यंतच्या सर्व बालकांना यापूर्वी त्यांना दिलेल्या लसीच्या मात्रांचा विचार न करता पोलिओ लस देण्यात येणार होती. आयुक्तांनी याबबत यंत्रणेचा आढावा घेतला होता. प्रत्येक लाभार्थींपासून घराघरापर्यंत पोहोचणारी ही लोकाभिमुख मोहीम आहे. शहरातील लाभार्थींपासून तात्पुरत्या वसाहती, स्थलांतरित वसाहतींमधील लाभार्थी, झोपडपट्टी, बांधकाम, वीटभट्ट्या आदी ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांनाही सेवा मिळेल असे नियोजन करण्यात आले होते. ५ जानेवारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला उपायुक्त अमित डेंगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. सीमा नेताम, शिक्षणाधिकारी डॉ. अब्दुल राजीक, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, एस.एम.ओ. डब्ल्यू.एच.ओ. डॉ. ठोसर, आर.सी.एच. नोडल ऑफिसर डॉ. विक्रांत राजुरकर, डॉ. प्रतिभा आत्राम, डॉ. वैशाली मोटघरे, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. रंजना बनारसे, डॉ. वासंती कडू, डॉ. पौर्णिमा उघडे, डॉ. फिरोज खान, डॉ. शारदा टेकाडे, स्वास्थ्य निरीक्षक आर.के. राठोड, शहर कार्यक्रम व्यवस्थापक वर्षा गुहे, शहर लेखा व्यवस्थापक संजय बगाडे आदी उपस्थित होते.