फोटो पी २९ चांदूरबाजार
चांदूरबाजार : दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आवर घालण्यासाठी कोरोना लसीकरण हेच एकमेव व अत्यंत प्रभावी माध्यम आहे. मात्र, सरकारकडून अत्यल्प प्रमाणात लसींचा पुरवठा होत असल्याने कधी ४ ते ५ दिवसांनंतर, तर कधी कधी आठवड्यांच्या अंतराने मर्यादित स्वरुपात लसीकरण होत आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचे लसीकरण व्हेंटिलेटरवर आहे.
तालुक्यात अंदाजे एक लाख २१ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आरोग्य विभागासमोर आहे. यात ग्रामीण विभागात एक लाख ७ हजार, ८५७ नागरिकांचा समावेश आहे. शहरातील १३ हजार १५० नागरिकांचा समावेश आहे. ग्रामीण भागात अंदाजे लसीकरण योग्य ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या, ४२ हजार ९७४ इतकी आहे. यात ४५ ते ५९ च्या दरम्यानच्या अंदाजे २२ हजार ३८७ , तर ६० वर्षांवरील २० हजार ५८७ नागरिकांचा समावेश आहे. तसेच शहरी भागात ४५ वर्षांवरील अंदाजे ७ हजार २१० नागरिक लसीकरणास पात्र आहेत. पैकी ३ हजार ९९१ नागरिक ४५ ते ५९ या वयोगटातील, तर ३ हजार २१३ नागरिक ६० वर्षांवरील आहेत. तसेच १८ ते ४४ या वयोगटातील एकूण अंदाजे ७० हजार ८०३ युवक शासनाच्या घोषणेप्रमाणे लसीकरणासाठी पात्र आहेत.
सरकारच्या पहिल्या दोन घोषणांप्रमाणे कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी तालुक्यातील अंदाजे ५१ हजार नागरिकांचे लसीकरण तातडीने होणे गरजेचे आहे. परंतु तालुक्याला लसींचा पुरवठा अतिशय धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे मागील अडीच महिन्यांत तालुक्यात फक्त १३ हजार ७७३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आरोग्य विभागाला प्राप्त लसींच्या संख्येनुसार रांगेतील नागरिकांना नंबरनुसार तेवढेच कुपन द्यावे लागतात. त्यामुळे दोन ते तीन तास रांगेत उभे राहूनही नंबर लागत नाही. याचा चांगलाच रोष नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
तालुक्यात १० लसीकरण केंद्र
दहा केंद्रांवर नागरिक लसीकरणासाठी रांगा लावून असतात. ज्यांचा नंबर लागत नाही, त्यांच्या रोषाला आरोग्य कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी तर नागरिक या कर्मचाऱ्यांना मारहाण करायलाही धावतात. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य विभागावर लसीकरणाचा प्रचंड ताण वाढत आहे. लसीकरणासाठी नागरिकांची प्रचंड मागणी, अशात लसींचा काही दिवसाआड अत्यल्प पुरवठा यामुळे आरोग्य विभागही हतबल झाला आहे.
कोट
एका दिवशी ३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. लसीच्या उपलब्धतेनुसारच केंद्रनिहाय लसीकरण करण्यात येत आहे. लसींची उपलब्धता वाढवल्यास त्यानुसार लसीकरण करण्याची, आरोग्य विभागाची तयारी आहे.
- डॉ.जोत्सना भगत, तालुका आरोग्य अधिकारी