अमरावती : कोरोनाने सर्वच प्रथा-परंपरा, रुढी संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. विवाह समारंभातील उपस्थितीवर मर्यादा आल्याने या काळात लग्न समारंभातील तामझाम आपसूकच कमी झाला आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधुपित्यांनी कोरोनाला वाकुल्या दाखवत अगदी थाटात आपल्याकडील लग्नाचा बार उडवून दिला. मुलामुलींचे लग्न थाटामाटात करण्याची प्रत्येक आई-वडिलाची इच्छा असते. त्याबद्दल काही जणांकडून जाहीर विरोधदेखील होतो. कोरोनाने विवाह समारंभातील या बडेजावाला ‘ब्रेक’ लागला आहे. सध्या राज्य सरकारने लागू केलेल्या लाकडॉऊनमध्ये लग्न सोहळ्यासाठी २५ जणांची उपस्थिती आणि दोन तास वेळ असे निर्बंध घातल्यामुळे काही वर, वधुपित्यांनी आपल्याकडील नियोजित विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत, तर बहुतांश प्रकरणात वर-वधुपक्षाने अगदी कौटुंबिक सोहळ्यात विवाह समारंभ उरकून घेतले. अगदी कमी खर्चात, कर्जबाजारी न होता विवाह पार पडत असल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय आई-वडिलांनी सुटकेचा निःश्वास टाकला, तर श्रीमंतांमधील लग्नात आनंद लुटायला मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
बॉक्स
कमी खर्चाचा धडा
विवाह सोहळ्यातील खर्चाच्या बचतीसाठी राज्यात सर्वत्र सामूहिक विवाह सोहळ्याची चळवळ राबविण्यात येत होती. मात्र, कोरोना विषाणू संकटाने वैयक्तिक विवाह सोहळा ही कमी खर्चात पार पाडता येतो, याचा धडा दिला आहे.