नगरसेविकेच्या पतीसह तरुणांचा पुढाकार, रात्रीलाच फोनवरून पौराहित्य, नगरपालिकेनेही जपली मानवता
परतवाडा : देवमाळी स्थित कोरोनासंक्रमित महिलेच्या मृतदेहावर परतवाड्यातील हिंदू स्मशानभूमीत होळीच्या दिवशी मध्यरात्रीनंतर रात्री दीड वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सवाष्ण असल्याने अंत्यसंस्काराकरिता आवश्यक साहित्य, सवाष्ण स्त्रीचा चुडा आणि नवे कोरे कपडेही तेवढ्याच रात्री दुकान उघडून आणले गेले. अंत्यसंस्काराकरिता मोबाईलवरुन तेवढ्याच रात्री पौराहित्य केले गेले.
देवमाळी बालाजीनगर स्थित ७० वर्षीय महिला कोरोनाने आजारी होती. डॉ. भामकर यांच्या दवाखान्यातील कोरोना केअर युनिटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान त्या कोरोना संक्रमित महिलेची होळीच्या दिवशीच रात्री ११ वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालवली. या महिलेचा मृतदेह आवश्यक ती काळजी घेत प्लास्टिकच्या पन्नीत गुंडाळला गेला. पन्नीत गुंडाळलेल्या या मृतदेहावर रात्रीच आवश्यक ती काळजी घेत अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना त्या मृत महिलेच्या नातेवाइकांना संबंधितांनी केल्या.
होळीचा दिवस, पौर्णिमा-अमावस्येची गुंतागुंत. सर्वत्र होळी पेटत असताना अंत्यसंस्कारासाठी नगरसेविका अक्षरा लहाने यांचे पती रुपेश लहाने यांच्याकडे मदत मागितली गेली. तेवढ्याच रात्री रूपेश लहाने यांनी श्रीकांत गावंडे, राजा ठाकरे, योगेश यादव, राहुल सातपुते या आपल्या मित्रांसह रुग्णालय गाठले. अॅम्ब्यूलन्स बोलावण्यात आली. रात्री १२ वाजताच्या सुमारास नगर परिषद उघडली गेली. अभियंता वानखडे यांनी कार्यालयातून पीपीई किट रूपेश लहानेंच्या सुपूर्द केली. मानवतेच्या परिचय देणाऱ्या त्या युवकांनी पीपीई किट घातल्यात. मृतदेह अॅम्ब्यूलन्समध्ये घेतला. रात्री एकच्या सुमारास त्या मृतक महिलेच्या चार नातेवाईकासह हिंदू स्मशानभूमी गाठली. तेवढ्या रात्री त्या युवकांनी स्वत:च लाकडे रचली. पन्नीत गुंडाळलेला रुग्णालयातून मिळालेला तो मृतदेह त्या लाकडांवर ठेवला. मृतदेहास अग्नी दिला गेला. कोरोनाकाळात कठीण प्रसंगी होळीच्या पर्वात रूपेश लहानेंसह त्याच्या मित्रांनी दाखवलेली मानवता, केलेली मदत शब्दापलीकडची ठरली आहे.
-----