मोर्शी : एक वर्षापासून जगात धुमाकूळ घालत असलेला कोरोना जनसामान्यांच्या मनातून गेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठेत सर्वत्र गर्दी होत असून, बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानांतील खरेदी-विक्री ‘ना मास्क, ना फिजिकल डिस्टंन्स’ अशी सुरू आहे. विशेष असे की, स्वत: व्यावसायिक व त्यांचे नोकरही विनामास्क वावरत आहेत.
शासनाने कोरोना अनलॉक सुरू करताच हळूहळू जनजीवन सुरळीत झाले. परंतु, सध्या नागरिक बाहेर वावरताना सर्व नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. यावर नियंत्रण ठेवणारे प्रशासन हातावर हात देऊन बसल्याने कुणालाच नियम पाळण्याची गरज वाटत नाही. सुजाण नागरिक मास्क वापरून इतरांना सजग करत असले तरी तुमच्यावर आला का कोरोना, म्हणून त्यांची खिल्ली उडवली जाते.
मोर्शी शहरातील शासकीय कार्यालये, बँक, दवाखाने वगळता कपडा, किराणा, भाजीवाला, कृषिसेवा केंद्रे, हॉटेल, चहा, पानटपरीवर कुणीही मास्क वापरत नाही किंवा फिजिकल डिस्टन्स पाळत नाही. तहसील कार्यालयाच्या परिसरातही हेच चित्र पाहावयास मिळते. शहरातील मेडिकल स्टोअर्समध्येही वेगळी स्थिती नाही.
कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ग्रामपंचायत निवडणूक, संक्रातीचे वाण यातून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात असतानाही नागरिकांचा मुक्त वावर आहे. लस आली असली तरीही ‘दवाई भी - कडाई भी’चा नागरिकांना विसर पडला आहे. प्रशासनाची भूमिका मूकदर्शकाची बनली आहे.